24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरसंपादकीय१७ सप्टेंबर, मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ की ‘सेवा निवृत्ती’ दिवस?

१७ सप्टेंबर, मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ की ‘सेवा निवृत्ती’ दिवस?

भागवत आणि मोदींना हातात हात घालून पुढे अनेक वर्षे काम करायचे आहे.

Google News Follow

Related

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे एक वक्तव्य कालपासून तुफान चर्चेत आहे. दिवंगत संघकर्मी मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर बेतलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा पुढचा मागचा संदर्भ न पाहाता शक्यतेचे पतंग बदवण्याचे काम मीडियाने सुरू केले. भागवतांच्या वक्तव्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीशी लावून अनेकजण मोकळे झाले. मोदी सत्तेत आल्यानंतर ज्यांच्या सत्तास्वप्नांना चूड लागली अशा लोकांपासून कट्टर मोदी समर्थकही या चर्चे सामील झाले. पंचाहत्तरीच्या शालीची चर्चा देशभरात सुरू आहे.

नागपूर येथे संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि रामजन्मभूमी आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडणारे मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर ‘मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्कीटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी वृंदावनमध्ये झालेल्या बैठकीतील मोरोपंताचा किस्सा त्यांनी सांगितला. बैठकीनंतर सरकार्यवाह हो.वे.शेषाद्रीजींनी मोरोपंतांना शाल घातली. त्यावेळी मोरोपंत म्हणाले, ‘पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली याचा अर्थ तुमचे वय झाले, बाजूला सरा, आता आम्हाला करू द्या.’

हे ही वाचा:

गोळीबाराची घटना; कपिल शर्माची टीम म्हणते ‘आम्ही हार मानणार नाही’

‘छांगुर बाबा’ला मुस्लिम देशांकडून धर्मांतरासाठी मिळाले ५०० कोटी रुपये!

…हा तर बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना घातलेला लगाम

भाजपने टी राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!

या वक्तव्यावरून तमाम राजकीय पक्षांनी मोदींना लक्ष्य केलेले आहे. कारण नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असतो. त्यांचा जन्म १९५० चा आहे. या दिवशी ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचा चांगलाच बभ्रा झालेला आहे. भाजपाकडून दरवर्षी हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा सेवा दिवस असेल की सेवानिवृत्तीचा दिवस, असा प्रश्न काहींना पडलेला आहे.

मोदींनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर ७५ वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात केली होती, हे या चर्चेचे सगळ्यात मोठे कारण. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा अनेकांचा समावेश यात होता. तिच फूटपट्टी मोदींना लावण्यात येणार काय, हा सवाल जोरदार चर्चिला जात आहे.

संघाला मोदींना हटवायचे आहे, सत्तेच्या शिखरावरून मोदींचा कडेलोट करायचा आहे, मोदी आणि संघात सुप्त संघर्ष आहे, असा अर्थ या वक्तव्यातून काढला जात आहे. काँग्रेसला विशेष उकळ्या फुटल्या आहेत. ‘सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी परदेश दौऱ्यावरून पुरस्कार घेऊन परतलेल्या मोदींचे कसे स्वागत केले ते पाहा. १७ सप्टेंबर रोजी मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याची आठवण भागवतांनी करून दिली’, अशी खोचक टीप्पणी जयराम रमेश यांनी केली.

‘भागवत आणि मोदी दोघांनी झोळ्या घेऊन निघून जावे आणि एकमेकांना सल्ले देत बसावे’, असे विधान काँग्रेसचे तोंडाळ प्रवक्ते पवन खेरा यांनी केले.

कोण काय म्हणाले, हे जरा बाजूला ठेवू. भागवत आणि मोदी यांच्यात संघर्ष आहे का, हा सवाल संघ स्वयंसेवक आणि भाजपा समर्थकांच्या मनातही आहे. जर असा संघर्ष असेल तर त्याची कारणे काय असू शकतील? सत्तेवर आल्यानंतर जो एजेंडा मोदी रेटण्याचा प्रयत्न करतायत तो संघाचा किंवा हिंदुत्वाचाच एजेंडा आहे. रामजन्मभूमीवर भव्य मंदीर बांधणे, कलम ३७० हटवणे, वक्फ सुधारणा कायदा, नागरीकत्व सुधारणा कायदा ही केवळ कामे नाहीत. ही संघाने वर्षोनुवर्षे उराशी बाळगलेलील स्वप्न आहेत. ही स्वप्न पूर्ण करण्यामागे मोदी नावाच्या माणसाचे असलेले योगदान कोणीच नाकारू शकत नाही.

जर मोदी संघाचा एजेंडा पुढे नेत असतील तर त्याला संघाचा विरोध असण्याचे कारण काय? नियम हे कामकाजाच्या सोयीचे असतात. उत्तम प्रकारे काम व्हावे म्हणून ते बदलता येतात. संघ संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे तहहयात सरसंघचालक होते, दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनीही अखेरच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली. परंतु पुढे बाळासाहेब देवरस, प्रा.राजेंद्र सिंह उर्फ रज्जूभैया, के.सी.सुदर्शन हे सर्व सरसंघचालक प्रकृती अस्वास्थामुळे पदावरून बाजूला झाले. जगातील सगळ्यात मोठ्या संघटनेचे प्रमुख पद इतक्या सहजासहजी कोणताही गलका आणि तमाशा केल्याशिवाय सोडता येत हे काँग्रेसवाल्याना कळायचे नाही, कारण हाती असलेली कोणतीही मरणाच्या दारात जाईपर्यंत सोडायची नाही हा त्यांचा खाक्या. किंवा मग सिताराम केसरी यांना कॉलरला धरून बाजूला करण्यात आले, तसे एखाद्याला हाकलायचे. हीच यांची संस्कृती.

मोदी १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही त्यांची प्रकृती खणखणीत आहे. विमानाच्या शिड्या उतरताना त्यांना आधार घेण्याची गरज वाटत नाही. ते आजही सुट्टी न घेता काम करतात. दिवसाचे १८ तास राबतात. आठ दिवसात पाच देशांचा दौरा करण्या इतपत शारीरीक क्षमता त्यांच्याकडे आहे. या दौऱ्यात त्यांचा दिनक्रम थकवणारा असतो. अनेक बैठका, कार्यक्रमांचे आय़ोजन असते. थोडक्यात मोदी ठणठणीत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची वाढत्या वयामुळे अनेकदा जाहीर कार्यक्रमात शोभा झाली, तसा प्रकार मोदींबाबत कधीही झालेला नाही. आणखी किमान पाच वर्षे ते देशाचे नेतृत्व करू शकतात.

संघाच्या विचारात व्यक्ति महात्म्य बसत नाही. कोणतीही व्यक्ति संघटनेपेक्षा मोठी नाही. व्यक्ति येत जात असतात संघटना मात्र स्थायी असते. मोदी संघापेक्षा मोठे झाले असल्यामुळे संघाचा त्यांना विरोध आहे, असे अनेकजण छातीवर हात ठेवून सांगत असतात. हा दावाच मुळात पोकळ आहे. भाजपाचे अध्यक्ष जगतप्रताप नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी वक्तव्य केले होते. ‘भाजपाचा व्याप आता वाढला आहे, आता आम्हाला संघाच्या समर्थनाची गरज नाही’, असे वक्तव्य केले होते. त्याचे परीणाम लोकसभा निवडणुकीत दिसले. भाजपाच्या जागा ३०३ वरून थेट २४० वर आल्या. पुढे विधानसभा निवडणुकीत संघ पूर्ण ताकदीने उतरल्यानंतर हे चित्र बदलले. हरीयाणात शून्य आणि महाराष्ट्रात कमी शक्यता असताना भाजपाला घवघवीत यश मिळाले. संघ सोबत असल्यामुळे काय होते आणि नसल्यामुळे हे चार महिन्याच्या अंतराने जगाला दिसले.
‘कित्त्येक पिढ्या खपल्या, त्यांच्या त्याग आणि परीश्रमामुळे आपल्याला आजचे दिवस दिसतायत’ हे मोदींनी अनेकदा जाहीरपणे कबूल केलेले आहे. व्यक्ति कितीही मोठी असली तरी ती संघटनेपेक्षा मोठी होऊ शकत नाही. संघटनेच्या ताकदीशिवाय एकटे मोदी काहीही करू शकत नाही, याची त्यांना जाण आहे. श्रीरामालाही लंका विजयासाठी वानरसेनेची गरज पडली होती. मोदींना हे माहित नसण्याचे काही कारणच नाही.

मोदींचा करीष्मा आणि संघाची ताकद एकत्र येते तेव्हा चमत्कार घडतो. या चमत्काराची देशाला आणखी काही वर्षे गरज आहे. अजून बऱ्याच गोष्टी मार्गी लावायच्या आहेत. २००४ चे २०१४ या काळात काँग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारने देशाला अराजकाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. ती वेळ आता  यायला नको अशी देशाची भावना आहे. संघाला ही भावना ठाऊक आहे.

संघाची विचार कऱण्याची पद्धत खूप वेगळी आहे. हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. देशभरात हे वर्ष धुमधडाक्यात साजरे करण्या इतकी ताकद संघाच्या संघटनेत आहे. संघटनेचा पसारा प्रचंड वाढलेला आहे. परंतु असे कोणतेही सेलिब्रेशन संघ करीत नाही. आपल्याला हिंदू संघटनेचे काम करायचे आहे, देशाला परमवैभवाला नेण्याचे काम करायचे आहे. शंभर वर्षातही हे काम पूर्ण झाले नाही, मग शंभरीचे सेलिब्रेशन कशाला करायचे, असा तर्क संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी देतात. असा सुद्धा विचार कोणी करू शकेल काय? संघाशिवाय कोणीही नाही.
संघाची शिस्त आणि संस्कार असे सांगतात, की दुसऱा कसा उभा राहीला आहे हे सांगण्यापेक्षा स्वत:चे दक्ष सुधारा, म्हणजे रांग आपोआप सरळ होईल. याचा अर्थ दुसऱ्याला सल्ले देण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या चुका सुधारल्या तर सगळे आपोआप ठिकठाक होईल.

‘पंचाहत्तरीची शाल ओढली याचा अर्थ थांबा, बाजूला व्हा, आम्हाल काम करू द्या’, हे मोरोपंतांचे शब्द भागवतांना आठवले. ते मोदींसाठी कशाला बोलतील? मोदी आणि भागवतांच्या वयात फक्त सहा दिवसांचे अंतर आहे. मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबर तर भागवतांचा ११ सप्टेंबर. आपलीही पंचाहत्तरी आलेली आहे, हे त्यांनाही माहित आहे. परंतु उद्या त्यांनी ठरवले की आता आपल्याला थांबायचे आहे, तर संघाचे पदाधिकारी त्यांना थांबू देतील? निश्चितपणे नाही. एकमेकांच्या उरावर बसणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. भागवत आणि मोदींना हातात हात घालून पुढे अनेक वर्षे काम करायचे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा