दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटरमध्ये २९ आणि ३० एप्रिल रोजी जगभरातील क्रिप्टो गुंतवणुकदारांचे TOKEN2049 हे वार्षिक एकत्रिकरण होणार होते. इराणच्या ड्रोन हल्ल्यात येथील डीआयएफसी इनोव्हेशन हबचे नुकसान झाल्यामुळे हा सोहळा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हे एकमेव उदाहरण नाही. गेल्या दोन दशकात कोट्यवधींची गुंतवणूक करून डीआयएफसीची निर्मिती करण्यात आली होती. जागतिक स्तरावरील बड्या कंपन्यांनी इथे आपली मुख्यालये थाटली होती. इराणने या सगळ्याची माती करण्याचे मनावर घेतलेले दिसते.
दुबईने तेलावरील अवलंबित्व कमी करून आपल्या अर्थकारणाची दिशा एआय आणि सेवाक्षेत्राकडे वळवण्यासाठी डीआयएफसीचा अत्यंत कल्पकतेने वापर केला. हे केंद्र भारतासह जगभरातील उद्योगपतींसाठी आकर्षण बिंदू ठरले. सध्या हे क्षेत्र इराणच्या रडारवर आले. इथे सतत हल्ले होत आहेत. शुक्रवारी इराणचे एक ड्रोन इनोव्हेशन हबच्या दिशेने आले. लक्ष्यावर धडकण्याआधी ते नष्ट करण्यात आले. परंतु यावेळी झालेल्या स्फोटामध्ये आजबाजूच्या इमारतींना मोठा हादरा बसला. इमारतीच्या काचा तडातडा फुटल्या. काळ्या धुराच्या लोटासह इथे मोठी आग भडकली. ती काही वेळातच नियंत्रणात आणण्यात आली. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे दुबई म्हणजे संपूर्ण सुरक्षा या लौकीकाला जबर धक्का बसला आहे. इराणचे ड्रोन हल्ले दुबईतील इमारतींचेच नुकसान करत नसून सुरक्षित शहर या लौकीकाचाही बट्ट्याबोळ करीत आहेत. इथे जे काही घडते आहे, त्याची माहीती सोशल मीडियावर टाकणाऱ्याला दंड आणि कारावासाची शिक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुबईत झालेल्या हल्ल्याचे खरे चित्र बाहेर येत नाही.
इनोव्हेशन हब येथील स्फोटानंतर इथे असलेली सिटी बँक, गोल्डमन सॅक्स, डेलॉईट आणि पीडब्ल्यूसी आदी बड्या कंपन्यांनी त्यांची कार्यालये तातडीने रिकामी करण्यात आली. या परिसरातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ दिलेले आहे.
या आधी १ मार्च रोजी झालेल्या हल्ल्यात अबुधाबी कमर्शिअल बँकेला लक्ष्य करण्यात आले. दुबईतील एमेझॉनच्या डेटा सेंटरवर हल्ला करण्यात आला. डेटा सेंटरवर हल्ला म्हणजे एखाद्या शहराला आंधळे करण्याचा प्रकार. तुमची एप्स, वेबसाईट सगळे काही कोसळणार. इराण हे सगळे नियोजनबद्ध रित्या करतो आहे. अमेरिकेचा हात सोडा नाही तर भोगा आपल्या कर्माची फळे. आखाती देशांनी इथून अमेरिकेचे लष्करी तळ उठवावे, असा सक्त इशारा इराणने दिलेला आहे. कमकुवत सैन्यबळ असलेल्या आखाती देशांसाठी इथे आड आणि तिथे विहीर असा प्रकार घडलेला आहे. अब्राहम अकॉर्डनंतर यूएई आणि इस्त्रायल यांनी हात मिळवणी केली, याचा इराणला प्रचंड राग आहे. त्यामुळे इराणच्या प्रहारांचा सर्वाधिक तडाखा यूएईला बसतो आहे. आज इराणच्या ड्रोन्सनी दुबईचा हा स्वर्ग बेचिराख केला.
तुमच्याकडे जर संरक्षण कवच नसेल तर आज इराण आहे, उद्या हल्ला करणारा कोणी दुसरा असेल. इथला शून्य आयकर, पायाभूत सुविधा आणि श्रीमंती पाहून जे दुबईत दाखल झाले. ते हा विचार निश्चितपणे करतील. हेच भय इराणला निर्माण करायचे होते. त्यात आज तरी तो यशस्वी ठरलेला आहे.
यूएई आणि सौदी अरेबियामध्ये महत्वाचा फरक म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये यूएईने तेल निर्यातदार देश ही प्रतिमा पुसली. दुबईला एक फायनान्शिअल हब बनवण्याचा प्रयत्न केला. जगातील कंपन्या इथे याव्यात म्हणून इथे प्रति स्वर्ग निर्माण करण्याचा प्रय़त्न इथल्या सत्ताधीशांनी केला. तो यशस्वीही झाला. इथे प्रदूषण नाही, वाहतुकीची कोंडी नाही, इथे अस्वच्छता नाही. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेची पूर्ण हमी. त्यामुळे जगातील जवळ जवळ प्रत्येक बड्या कंपनीने इथे कार्यालय थाटले आहे.
मायक्रोसॉफ्ट, गुगल, एमेझॉन, आयबीएम, ओरॅकल, सिस्को आदी आयटी कंपन्या एचएसबीसी, स्टॅडर्ट चार्टर्ड, सिटी ग्रुप, जे.पी.मॉर्गन, या वित्तिय संस्था. मेकेन्झी, बोस्ट, डेलॉईट, प्राईस वॉटर कूपर्स, अरनेस्ट एण्ड यंग या कन्सल्टींग फर्म तसेच सॅमसंग, सोनी, सिमेन्स या टेक कंपन्या, शेल, एक्झॉन मोबिल या तेल कंपन्या अशा सगळ्या प्रकारच्या कंपन्यांची कार्यालये इथे आहेत. शून्य टक्के आय़कर, युरोप, आशिया आणि आफ्रीकेला सोयीचे असे भौगोलिक स्थान, जागतिक दर्जाच्या पायाभूत आणि व्यावसायिक सुविधा ही डीआयएफसीची वैशिष्ट्ये आहेत.
एक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दुबईत फायनान्स आणि आयटीसोबत एआयचा प्रयोग करण्यासाठी विस्तारीकरणाच्या योजना सुरू झाल्या. दुबईच्या झबील जिल्ह्यात सुमारे ११० हेक्टर क्षेत्रावर डीआयएफसीचा विस्तार पसरलेला आहे. त्यात २०२६ च्या सुरुवातीला जाहीर झालेल्या नवीन विस्तारानुसार, यात आणखी ७.१ दशलक्ष स्क्वेअर फूट जमिनीची भर टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. या विस्तारानंतर एकूण बांधकाम ७.७ दशलक्ष चौरस फूट होईल.
डीआयएफसी मध्ये सध्या लहान-मोठ्या मिळून साधारण ४५ हून अधिक प्रमुख इमारती आहेत. यामध्ये ‘द गेट’ ही मुख्य इमारत, ‘इंडेक्स टॉवर’, ‘एमिरेट्स फायनान्शिअल टॉवर्स’ आणि ‘आयसीडी ब्रूकफील्ड प्लेस’ यांसारख्या प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींचा समावेश आहे. २००४ मध्ये झालेल्या डीआयएफसी च्या स्थापनेपासून आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
सध्या दुबईला जगाचे क्रिप्टो कॅपिटल आणि एआय हब बनवण्याच्या दिशेने काम सुरू होते. इथे तेल स्वस्त त्यामुळे वीज मुबलक आहे. वेगवान इंटरनेट आणि वीजेच्या उपलब्धतेमुळे टेक कंपन्यांनी इथे मोठ्या संख्येने डेटा सेंटरची निर्मिती केली. फायनान्शिअल हबचा विस्तार करणे त्या दृष्टीने महत्वाचे होते. ‘झबील डिस्ट्रिक्ट’ या विस्तारासाठी दुबई सरकारने १०० अब्ज दिराम म्हणजे सुमारे २७.२ अब्ज डॉलर्स इतक्या महाकाय गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश दुबईला जगातील अव्वल ४ आर्थिक केंद्रांपैकी एक बनवणे हा आहे.
गेट अव्हेन्यू ही एक लांब पादचारी मार्गिका आहे, जी संपूर्ण जिल्ह्याला जोडते. येथे रिटेल स्टोअर्स, आर्ट गॅलरीज आणि रेस्टॉरंट्स आहेत. नवीन विस्तारामध्ये जगातील सर्वात मोठा ‘एआय कॅम्पस’ उभारला जात आहे, जिथे ३० हजारा हून अधिक तंत्रज्ञान तज्ज्ञ काम करू शकतील.
येथे आर्थिक आणि कायदेशीर प्रशिक्षणासाठी एक स्वतंत्र अकादमी आहे, ज्याची क्षमता आता ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाढवली जात आहे. हे केवळ व्यवसायाचे केंद्र नाही, तर दुबईचे ‘आर्ट हब’ देखील आहे. येथे अनेक प्रतिष्ठित आर्ट गॅलरीज आणि प्रदर्शने भरवली जातात.
दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर हे मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया या क्षेत्रातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २००४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र जागतिक स्तरावर लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूरच्या बरोबरीने उभे आहे.
हे ही वाचा:
IRINS लावनच्या अनावश्यक क्रू मेंबर्सला भारताने पाठवले मायदेशी!
उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
१ एप्रिलपासून टोल प्रवास महागणार
अमेरिकेचा ‘यू व्हिसा’ मिळवण्यासाठी ११ भारतीयांनी टाकला बनावट दरोडा
जगभरातील उच्चभ्रुंचा राबता असलेल्या डीआयएफसीमध्ये श्रीमंतीचा झगमगाट आहे. हे केवळ एक ऑफिस कॉम्प्लेक्स नसून, ते एक अत्याधुनिक ‘अर्बन डेस्टिनेशन’ आहे. येथे जागतिक दर्जाची हॉटेल, आर्ट गॅलरीज, महागडी रेस्टॉरंट्स आणि निवासी टॉवर्स आहेत. जभरातील कार्सचे सगळ्यात उंची आणि महागडे ब्रॅण्ड्स इथल्या रस्त्यावर दिसतात.
टोकन २०४९ हा क्रिप्टो उपक्रम लांबवणीवर पडला, परंतु हा एकमेव नाही. इथली पंचतारांकीत हॉटेल्स ओस पडली आहेत. भाड्याने मिळणाऱ्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्शे, लॅण्ड रोव्हर्सना इथे सध्या तरी गिऱ्हाइक नाही. इराणचे हल्ले कधी थांबतील याचा नेम नाही. इराणला यूएईचे अधिकच वाईट करायचे असेल तर जलशुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्याचा प्रय़त्नही केला जाईल. यूएईचे पाणी तोडले तर इथे हलकल्लोळ माजेल. हे ड्रोन हल्ल्यांपेक्षा जास्त भयंकर ठरेल. हल्ले थांबल्यानंतर झालेली पडझड सावरायला यूएईला बराच वेळ लागणार आहे. सर्वकाही पूर्ववत झाल्यानंतर इमारती उभ्या राहतील. परंतु पूर्वीची ती चमक राहील का? इथे स्वर्ग आहे, या अपेक्षेने ज्या कंपन्या आणि जगभरातील अति श्रीमंत अब्जाधीश इथे कायमचे बस्तान ठोकायला आले होते, ते भविष्यात इथे राहतील काय, हाच महत्वाचा सवाल आहे. सध्या तरी याचे उत्तर नकारार्थी आहे. इराणाला हेच साध्य करायचे आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







