संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची भारतीय सेनेने कशी सालटी काढली, पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे उत्तर कसे दिले, भारतीय लष्कराने कशी कमाल केली, याबाबत सत्ताधारी पक्ष पुराव्यासह बोलतो आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची, त्यांच्या तैनातीत असलेल्या चिल्लर पक्षांच्या नेत्यांची संसदेतील भाषणे ऐकली की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पाकिस्तान नावाच्या टुकार भिकार देशाचे एक कर्तृत्व लक्षात येते. हे कर्तृत्त्व लहान सहान नाही. प्रचंड मोठे आहे. सर्वसामान्य भारतीयांनीही ते जाणून घेण्याची गरज आहे.
एखाद्या गंभीर विषयावर चर्चेची, विशेष अधिवेशनाची मागणी करायची आणि प्रत्यक्षात ही चर्चा करण्याची संधी येते तेव्हा गोंधळ घालायचा. चर्चा होणारच नाही किंवा जमेल तितके अडथळे येतील हे पाहायचे, ही काँग्रेसची रणनीती गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळालेली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी घेतलेली बोटचेपी, नपुंसक भूमिका आणि केलेली कर्म सगळ्याचा जनतेला विसर पडलाय अशा समजात हे लोक बोलत असतात, त्यामुळे नेहमी उघडे पडत असतात. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी काल दिलेल्या मुलाखतीत केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
हे वक्तव्य पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात होते. ‘या दहशतवांद्यांची ओळख पटली आहे का? ते कुठून आले? ते भारतातील असू शकतात’. असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. हे वक्तव्य उघड उघड पाकिस्तान धार्जिणे आहे. चिदंबरम पाकिस्तानची भाषा बोलतायत, असा प्रतिवाद भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.
चिदंबरम यांना जो प्रश्न पडलाय, सुदैवाने त्याचे उत्तर आज केंद्र सरकारकडे आणि पर्यायाने देशाकडे आहे. काल भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत पहेलगामचा रक्तपात घडवणाऱ्या दहशतवाद्यांना ढगात पाठवले. ज्यांनी पहेलगाममध्ये धर्म विचारून हत्या केल्या, त्यांचा न्याय केला. तिथे या दहशतवाद्यांनी ज्या बंदूका वापरल्या होत्या, त्याच बंदूका काल ठार केलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या आहेत. काल रात्रभर बसून सहा तज्ज्ञ या बंदूकांचे फोरेन्सिक विश्लेषण करण्याचे काम करत होते. त्यांनी या माहितीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी चॉकलेट्स सापडली आहेत.
काल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी ओसामाला घरात घुसून मारले त्याची आठवण केंद्र सरकारला करून दिली होती. आज ते संसदेत केंद्र सरकारचे कौतूक करतील का? याचे उत्तर अजिबात नाही, असे आहे. उबाठाचे माजी खासदार राजन विचारे म्हणालेत, दहशतवाद्यांना मारले तर उपकार केले काय? उबाठाच्या नेत्यांची लायकी सांगणारी ही विधाने आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर विदेशी पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात प्रियांका चतुर्वेदी का होत्या आणि सावंत का नव्हते, याचे उत्तर सावंतांनी संसदेत तोंड उघडून स्वत:च देऊन टाकले. राष्ट्रीय मुद्द्यांवर पक्षीय राजकारण करणारे हे खुजे नेते. काँग्रेसचे जोडे उचलणे हेच यांचे जीवित कार्य उरले आहे.
काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलतात, कधी चीनची भाषा बोलतात हा विषय काही नवा नाही. इथे मुद्दा तो नाही. चिदंबरम यांचे वक्तव्य त्यांच्या आधीच्या वक्तव्याच्या नेमके उलट आहे, ही बाब लक्षात घ्या.
२६/११ घडले तेव्हा केंद्रीय गृहमंत्री पदावर असलेले शिवराज पाटील हल्ल्याची माहिती घ्यायचे सोडून दिवसभर कपडे बदलण्यात मश्गूल होते. मीडियात याबाबत बोभाटा झाल्यामुळे त्यांना हाकलावे लागले. त्यानंतर चिदंबरम आले. ‘२६/११ च्या हल्ल्यात मुंबईतील एक स्थानिक घरभेद्याचा समावेश होता’, असा स्पष्ट निर्वाळा हल्ला प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालात ठसठशीतपणे नोंदवण्यात आलेला आहे. केंद्रीय गृह सचिव राम प्रधान हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्याने अधोरेखित करून चिदंबरम यांच्या निदर्शनास आणून दिला होता, परंतु त्यांनी या मुद्द्याकडे साफ दुर्लक्ष केले असा गौप्सस्फोट केला होता.
हे ही वाचा:
भारत-अमेरिका व्यापार करार: अमेरिकेचे शिष्टमंडळ २५ ऑगस्ट रोजी भारत दौऱ्यावर!
‘द हिंदू’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रधान यांनी ही माहिती उघड केली होती. हा गौप्यस्फोट काँग्रेसचे चरित्र सांगून गेला होता. तेव्हा ज्या चिदंबरम यांना पाकिस्तानची मदत करणारा मुंबईतील घरभेदी शोधण्याची इच्छा नव्हती तेच आज पहेलगाम हल्ल्याबाबत होमग्रोन टेररीस्टचा मुद्दा उपस्थित करतायत. हा प्रश्न अमेरिकेलाही पडला नव्हता. म्हणून त्यांनी लष्कर ए तोयबाचा ताजा मुखवटा असलेल्या द रेसिस्टंट फ्रण्ट या दहशतवादी संघटनेवर पहेलगाम हल्ल्यानंतर बंदी घातली.
दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या घातपात्यांना मोकाट सोडणे हे काँग्रेसचे धोरण असावे. हा विषय मतपेढीशी संबंध असल्यामुळे असेल कदाचित. ११ जुलै २००६ च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. निर्दोष आरोपींना गजाआड करण्यात आले होते. खऱ्या दोषींना हात लावण्याची इच्छा तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकारला नसावी. ज्या १२ आरोपींना एटीएसने या प्रकरणात अटक केली होती, त्यांनी दावा केला होता की हा स्फोट इंडियन मुजाहिदीनने घडवला असून त्यात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आसिफ शेख या दहशतवाद्याचा हात आहे. परंतु या आसिफ शेखचा सहभाग लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात होता असे मान्य केले तर एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रासह सगळे तपशील बोगस आहेत, हे उघड झाले असते. म्हणून एटीएसने आसिफ शेखला क्लीनचिट देण्यात आली. म्हणजे काँग्रेस सत्तेवर असताना २००६चे लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील खरे आरोपी कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहीले, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील राम प्रधान यांनी अंगूली निर्देश केलेला घरभेदी सुरक्षित राहीला. या हल्ल्यात अटक करण्यात आलेला अबु जुंदाल हा बीड जिल्ह्यातील गेवराईतील रहीवासी होता. प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी तो कराचीतील लष्कर ए तोयबाच्या कण्ट्रोल रुममध्ये होता. सौदी अरेबियातून त्याला भारतात हस्तांतरीत करण्यात आले. तरीही चिदंबरम २००८ च्या हल्ल्यात भारतीय कनेक्शन नाही, असे छातीवर हात ठेवून सांगत होते. हा हातात आला तरीही २६/११ चे हिंदुस्तानमध्ये धागेदोरे नाहीत, असे चिदंबरम म्हणत होते कारण त्यांना ते धागेदोर खणण्यात काडीचाही रस नव्हता. प्रधान यांनी द हिंदूला दिलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटातून हाच मुद्दा प्रकर्षाने स्पष्ट झाला.
तेच चिदंबरम आज होमग्रोन टेररीस्टचा मुद्दा उपस्थित करतायत याचे कारण समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेसला तेच करायचे आहे, जे पाकिस्तान आणि चीनच्या पथ्यावर पडेल. म्हणून त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे मुंबईतील पाकिस्तान कनेक्शन खणले नाही. २००६ च्या प्रकरणात आसिफ शेखला क्लिनचिट दिली. २०२५ मध्ये पहेलगाममध्ये झालेल्या हल्लात होमग्रोन टेररीझम दाखवण्याचे काम केले.
ज्या पाकिस्तानी कर्तृत्वाबाबत आम्ही बोलतोय ते हेच आहे. ज्या देशाला स्वातंत्र्यानंतर आपली अर्थव्यवस्था सावरता आली नाही, प्रगतीच्या वाटेवर पुढे सरकता आले नाही, जो देश कायम चीन किंवा अमेरिकेच्या भिकेवर जगला, त्याचे कर्तृत्त्व काय असू शकते? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर कायम पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांकडे पाहा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानांचा वापर पाकिस्तानकडून जागतिक स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी केला जातो. त्यांचे नेते कायम पाकिस्तानचे दावे मजबूत करण्याचे काम करतात. शत्रू देशाला पोखरण्यासाठी एखाद्या माणसाला किंवा काही लोकांना विकत घेतले जाते. त्यांना गळाला लावून गद्दारीचे धडे दिले जातात. त्यांचा वापर त्यांच्याच देशाच्या विरोधात केला जातो. इथे पाकिस्तानने अवघ्या पक्षाला आपल्या कामाला लावले आहे. भारतात राहून हे लोक पाकिस्तानची चाकरी करतायत. पक्षातील जे लोक हे काम करीत नाहीत, त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा नाकारला जातो. कारण ते पाकिस्तानची तळी न उचलता भारताची बाजू मांडतात. शशी थरूर यांचे उदाहरण आहे. हेच करत राहीलात तर आणखी २० वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागेल असा दम गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना काल संसदेत दिला. परंतु २० वर्षांनंतर तरी हे लोक सत्तेत यायला कशाला हवेत. यांना बुडवलेच पाहिजे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







