32 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरसंपादकीयमोदी नीती ट्रम्प गाढवावरून पुन्हा घोड्यावर

मोदी नीती ट्रम्प गाढवावरून पुन्हा घोड्यावर

Google News Follow

Related

एका बाजूला इराणने भारताला पहिला गॅस टॅंकर पाठवल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या बाजूला बराच काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा गाढवावरून घोड्यावर आले आहेत. मी आणि मोदी आम्ही दोघे सगळं काही ठीकठाक करून असे विधान त्यांनी केले आहे. आखातात अमेरिका आणि इराण हे देश एकमेकांना भिडतायत. दुसऱ्या बाजूला दोन्ही देश भारताचा जय जयकार करतायत, मोदींबाबत विश्वास व्यक्त करतायत, असे विस्मयकारक चित्र जग बघते आहे. देशाच्या परराष्ट्र नीतीबाबत काँग्रेसवाले करपट ढेकर काढत असताना जगात मोदी नीतीचा बोलबाला दिसतो आहे.

देशात काही नेत्यांना मोदी नाव घेतले की पोटदुखी सुरू होते. परराष्ट्र धोरणाच्या प्रातांतील मोदींचे यश त्यांना मान्य नसते किंवा मान्य करण्याची त्यांची तयारी नसते. ही मंडळी सतत मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याची स्वप्न बघत असतात. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी २०२६ नंतर पंतप्रधान पदावर राहणार नाहीत, अश भविष्यवाणी केली आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणालाच लाभलेला नाही. प्रत्येकाला सत्तेवरून कधी तरी पायउतार व्हावे लागते. मोदीही त्याला अपवाद नाहीत. परंतु सत्तेवर असताना त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. परराष्ट्र धोरणाचे क्षेत्र त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून तिरंगा लावलेली जहाजे सही सलामत भारताच्या दिशेने रवाना होत आहेत, भारत माता की जय, अशा घोषणांच्या गजरात ती भारतीय बंदरांवर दाखल होत आहेत. इराणने ज्या पाच देशांना होर्मुजमधून निर्विघ्न येजा करता येईल असे जाहीर केले आहे, त्यात चीन आणि रशियासोबत भारताचाही समावेश आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागछी यांनी हे जाहीर केले आहे.  हे कमी होते की काय, म्हणून इराणने आठ वर्षांनंतर भारताला गॅस पुरवठा केलेला असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,६९० अंकांनी कोसळला

घराणेशाही संपुष्टात आणत नेपाळमध्ये बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

रुपयाचा ऐतिहासिक घसरणीचा धक्का! डॉलरसमोर ९४ पार

अमेरिकन चलनावर डोनाल्ड ट्रम्प यांची सही

ही कमाल आहे मोदी नीतीची. मोदींना परराष्ट्र धोरण कळत नाही असे म्हणणाऱ्या डोमकावळ्यांना ही थप्पड आहे. घरी ज्यांचे बायकोही ऐकत नाही, मुलं ज्यांना गंभीरपणे घेत नाहीत, आजूबाजूला ज्यांना कोणी ओळखत नाही, अशी मंडळी नरेंद्र मोदींना परराष्ट्र धोरणाचे धडे देत होती. काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, कोणाच्या बाजूला उभे राहिले पाहिजे, त्याचे सल्ले देत होती. त्यावेळी मोदींची भूमिका एकदम स्पष्ट होती. तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात, या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे मुत्सद्देगिरीची परिसीमा आहे.

‘आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत, आम्ही शांततेच्या बाजूने उभी आहोत, आम्ही संवादाच्या बाजूने उभे आहोत’, असे उत्तर मोदींनी दिले. मोदी खरे बोलले, त्यांना विनाकारण इस्त्रायल किंवा इराणची चाटुकारिता केली नाही, त्यांनी कोणालाही चुचकारले नाही. त्यांनी कोणाचेही समर्थन केले नाही. युद्धाच्या कठीण काळात त्यांनी आपली व्यावहारीक भूमिका जगाला ठणकावून सांगितली.  ‘देशाचे हित आणि आमची ऊर्जा सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे’. लोकांना हा प्रामाणिकपणा पटतो आहे. मागून पॅण्ट फाटली असताना उगाचच जगाला शहाणपणाचे डोस देण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. त्यांनी दांभिकपणा केला नाही, अश्रू ढाळले नाहीत, बांगड्या फोडल्या नाहीत. त्यामुळे मोदी नीती सुपर हिट ठरते आहे.

जगात काय परिस्थिती आहे पाहा, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळसह युरोपातील अनेक देशांमध्ये पेट्रोल डीझेलच्या किंमती भडकलेल्या असताना भारत सरकारने त्यातुलनेत किमती स्थिर ठेवल्या आहेत. ‘देशात ६० दिवस पुरेल इतका इंधनाचा साठा आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसवाले गॅस तुटवड्याचे भांडवल कऱण्यासाठी प्रचंड आतूर आहेत, परंतु तेलंगणा सरकारनेही  ‘पेट्रोल डीझेलचा तुटवडा नाही, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये’, अशा पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. अफवा पसरवू नका असे त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना म्हणजे राहुल गांधींना सांगितलेले दिसते. इंधन तुटवड्याबाबत सर्वाधिक अफवा राहुल गांधी पसरवतायत.

एखाद्या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी काही तरी निर्णय घ्यायचा आणि सारवासारव करून मोकळे व्हायचे असे मोदींना करता आले असते. जसे डॉ.मनमोहन सिंह यांनी यूपीएस सरकारच्या काळात केले होते. मोदी सरकारने इंधनाच्या किमती स्थिर ठेवताना तेल कंपन्यांना त्याची फारशी झळ बसून नये म्हणून अबकारी करात कपात केली. म्हणजे जनतेला दिलासा देताना तेल कंपन्यांचा बाजार उठणार नाही, याचीही काळजी घेतली आहे. याच्या उलट अर्थजज्ज्ञ पंतप्रधान यांनी ऑईल बॉण्ड जारी करून आजचे मरण उद्यावर ढकलले होते. तेल कंपन्यांची वाट लावली होती आणि त्यांनी केलेले दोन लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारला फेडावे लागले. सरकारच्या धोरणात कमालीचा समतोल दिसतो आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबाबत धोरण म्हणजे कधी घोड्यावर तर कधी गाढवाववर असते. मोदी किंवा त्यांचे समर्थक त्यांची प्रशंसा कधीही मनावर घेत नाहीत, त्यांच्या टिकेला उत्तर देत नाहीत. त्यांना जे काही करायचे ते करतात. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अमेरिकेच्या दूतावासाने त्यांच्या एक्सवर पोस्ट केले आहे. ‘मोदी एण्ड आय टू पीपल दॅट गेट द थिंग्स डन.’

ही स्तुती ट्रम्प यांची चाटुकारिता करून मिळवलेली नाही. सीआयएचा खतरनाक हस्त मॅथ्यू व्हॅनडीकला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्याची धमक केंद्र सरकारने दाखवली आहे. मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी खुंटीला टांगल्या आहेत. बोईंगसोबत सुरू असलेला पोसायडन पी-8 आय या टेहळणी विमानांचा सौदा थंड्या बस्त्यात टाकला आहे. तरीही ट्रम्प यांना मोदींची स्तुती करावी लागते आहे.

डॉ.मनमोहन सिंह सप्टेंबर २००८ मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथे ते अमेरिकेचे तत्कालीन पंतप्रधान जॉर्ज डब्लू बुश यांना म्हणाले ‘पीपल ऑफ इंडिया डीपली लव्ह यू’. जिथे तिथे अशी चाटूकारीता करून उपयोग झाला नाही. अमेरिकेचा पिट्टू असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान मनमोहन यांचा उल्लेख देहाती औरत असा करीत असत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मनमोहन यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशाचे सार्वजनिक रित्या तुकडे करत असत. त्या मनमोहन यांच्या कडून मोदींनी धडे घ्यावे असा सल्ला काँग्रेसचे नेते देत असतात.

संकटाच्या काळात काम करण्याचा दांडगा अनुभव मोदींकडे आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी मोदी गुजरातचे पंतप्रधान झाले, त्या आधी जानेवारी महिन्यात भुजचा भूकंप झाला होता. पंतप्रधान म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये कोविड महामारी आली होती. युक्रेन रशिया युद्ध सुरू झाले. आणि आता इराण युद्ध. प्रत्येक वेळी त्यांनी योग्य रणनीती स्वीकारलेली दिसते. युद्ध आणि इंधन समस्येनंतर गोल्डमन सॅक्स, आयएमएफ यांनी भारताच्या जीडीपीचा प्रस्तावित दर कमी केला आहे. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर वाढेल, वित्तिय तूट वाढले असा इशारा दिला आहे. परंतु जगाच्या तुलनेत भारताचा विकास चांगला असेल असेही तमाम वित्तसंस्था ठामपणे सांगतायत.

रशियाकडून आपण स्वस्त दरात तेल विकत घेत होतो. तसाच एखादा करार जर आपण इराणसोबत करू शकलो तर भारतासाठी तो मोठा विजय ठरेल. रशियाच्या तुलनेत इराण अगदीच जवळ असल्यामुळे वाहतुक खर्च आणि विमा खर्च खूप कमी होईल. शिवाय एकाच देशावर अवलंबून जे नुकसान होते ते टळेल.

मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा चमत्कार यापूर्वीही जगाने पाहिला आहे. युक्रेन युद्धाच्या काळात भारतीय विद्यार्थी आणि नागरीकांना तिथून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आले होते. रशिया युक्रेन दोन्ही देशांनी युद्ध थांबवून काही तासांचा अवकाश दिला आणि भारताने २३ हजार विद्यार्थ्यांना सहीसलामत बाहेर काढले. हा परराष्ट्र नीतीचा चमत्कार नाही तर दुसरे काय? परंतु तरीही काही लोकांना मोदी नावाची एलर्जी असल्यामुळे या कारनाम्यांचे कौतूक होत नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा