अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज भारताला धमक्या देत आहेत. रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणत आहेत. भारतावर लादलेले २५ टक्के टेरीफ आणखी वाढू शकेल अशी विधाने करयातय. ते भारताला चटके देण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु आग मात्र अमेरिकेत लागली आहे. गुंतवणूक क्षेत्रातील भीष्माचार्य वॉरेन बफेट यांच्यापासून अनेक जण कळवळतायत. अमेरिकेच्या अर्थकारणातील ११ व्या क्रमांकावर असलेले बफेट यांची महाकाय कंपनी बर्कशायर हैथवेला ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा झटका बसल्याचे काल जाहीर झालेल्या अहवालातून उघड झाले आहे.
भारत फक्त रशियाकडून तेलखरेदी करीत नाही, हे तेल जगभरात निर्यात करून पैसे कमवतो. यूक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची भारताला पर्वा नाही. म्हणून मी भारतावर टेरीफ वाढवत नेणार अशी एक ताजी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर टाकली आहे.
ट्रम्प त्यांच्या ट्रुथ सोशल वरून रोज अशी बकवास करतात. भारताच्या विरोधात गरळ ओकतात. जुने वैमनस्य असल्यासारखी त्यांची वागणूक आहे. परंतु ट्रम्प यांची ही वागणूक फक्त भारतासोबत नाही. त्यांनी स्विस घडाळ्यांवर ३९ टक्के टेरीफ आकारले आहे. डोक्यावर बंदूक ठेवून ते जगातील तमाम नेत्यांना शरण आणू इच्छितात. ट्रम्प यांच्यासोबत ट्रेड डील झालेले देश किंवा ईयूसारखा गट समाधानी नाही. ट्रम्प यांच्या धमकीमुळे युरोपियन युनियनने व्यापार केला.
ट्रम्प यांनी जाहीर केले की युरोपियन युनियन भारतात ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल, परंतु आता मात्र त्यांनी काखा वर केल्या आहेत. हे आम्हाला शक्य नाही, हे आमच्या क्षमतेच्या बाहेरचे आहे. गुंतवणूक झालीच तर ती कंपन्यांच्या माध्यमातून होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजे करार न करून अडचण करूनही अडचण असा हा प्रकार आहे.
भारताने आता ट्रम्प यांना शिंगावर घ्यायचे ठरवलेले आहे. त्यामुळे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी अमेरिका आणि युरोप रशियासोबत कसा आणि किती व्यापार करतात याचे आकडेच जाहीर केले आहेत. हा व्यापार भारत रशियाच्या व्यापारापेक्षाही जास्त असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
हे युद्ध अधिक तीव्र होणार हे नक्की. रशिया, चीन जुमानत नाहीत, किमान भारताला तरी दबाव टाकून कह्यात घ्यावे असा ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. परंतु भारत त्यांना फार भाव देताना दिसत नाही. त्यामुळे हे चिघळणार हे स्पष्ट दिसते आहे.
ट्रम्प झटका आल्यासारखे भारताच्या विरोधात बरळतायत. बहुधा भारताने अमेरिकेची एफ-३५ लढाऊ विमानांची ऑफर धुडकावल्यामुळे ते भडकले आहेत. ही विमाने रशियाकडून खरेदी केली जाणार या शंकेने धगधगतायत. भारताने जर रशियाची एसयू-५७ ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने विकत घेण्याचा सौदा केला तर ट्रम्प काय करतील कोण जाणे. ते जे काही करतील ते करतील, परंतु भारताने मात्र ट्रम्प यांच्या दमबाजीला किंमत द्यायची नाही, असे ठरवले आहे. इतका दबाव टाकल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सप्टेंबरमध्ये रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्या प्रस्तावित भारत भेटीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा आहे. म्हणजे रशियाशी संबंध तोडणे तर दूरची गोष्ट भारत हे संबंध कधी नव्हे इतके भक्कम करण्याच्या प्रयत्नांत आहे. पुतीन यांच्या भारतभेटीच्या दरम्यान अनेक महत्वाच्या घोषणा आणि काही करार होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांना हे सगळे अनपेक्षित होते.
ट्रम्प भडकण्याची कारणे अनेक आहेत. अमेरिकेची शस्त्रास्त्र बाजारपेठ असलेल्या आखाती देशांत भारताने शिरकाव केलेला आहे. यूएईने भारतासोबत संरक्षण सहयोग करार केलेला आहे. हा करार प्रशिक्षणाशी संबंधित असला तरी यूएईने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे कौतूक केले आहे. ब्रह्मोसचा डंका सगळ्या जगात वाजतोयत. भारत जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेतील एक नवा पर्याय म्हणून पुढे येतो आहे. आणखी एक कारण असू शकते. ते म्हणजे, नामांकीत न्यूज एंकर पल्की शर्मा उपाध्याय. मानवजातीने ट्रम्प यांचे आभार मानले पाहीजे, ते नसते तर सुर्य सकाळी उगवला नसता, पाऊस पडला नसता, गुरुत्वाकर्षणाचे नियम बदलले असते. अशी उपहासाने भरलेली एका पेक्षा एक तिखट विधाने त्यांना फर्स्ट पोस्टवर एका टेलिकास्टमध्ये केली होती. हा व्हीडीयो प्रचंड व्हायरल झाला. तो बहुधा ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचला असण्याची शक्यता आहे.
जेव्हा हत्तींची साठमारी होते, तेव्हा जमीनीवरील गवत तुडवले जाते, अशा आशयाचे एक सुभाषित आहे. अमेरिकी उद्योगातील दिग्गजांची परिस्थिती या गवतासारखी झालेली आहे.
बफेट यांची मालकी असलेल्या बर्कशायर हॅथवेचा महसूल दुसऱ्या तिमाहीच्या अहवालात ५.१ टक्क्यांनी घसरला आहे. ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा दबाव धंद्यावर जाणवतो आहे. धोरणाच्या अनिश्चतेमुळे ऑर्डर आणि शिपमेंटमध्ये विलंब होतोय. त्याचा थेट परीणाम व्यवसायावर होताना दिसतोय. कंपनीची विक्री घटली आहे.
मार्च महिन्यात बफेट म्हणाले होते की, समतोल व्यापार जगासाठी फायदेशीर आहे. टेरीफचा वापर एखाद्या हत्यारासारखा होऊ नये. बफेट यांनी ट्रम्प यांचे कान उपटले होते. बफेट हे जगातील अत्यंत यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. पैसा कसा वाढवायाचा या विषयातील तज्ज्ञ. बर्कशायर हॅथवे सारख्या कंपन्यांच्या खांद्यावर अमेरिकेचे अर्थकारण उभे आहे. कंपनीचे भांडवल ८६.७२५ ट्रिलियन इतके आहे. अमेरिकेतील ११ व्या क्रमांकाची कंपनी. बफेट काय म्हणतात हे जगभरातील गुंतवणुकदार प्राण कानात आणून ऐकत असतात. तेच बफेट ट्रम्प यांच्यावर नाखूष आहेत. त्यांची कंपनी ट्रम्प यांच्या धोरणांमुळे तोट्यात चालली आहे.
हे ही वाचा:
जनधन योजनेमुळे आर्थिक सेवा गरिबांपर्यंत पोहोचल्या
टीबीसाठी अत्यंत घातक आहे डायबेटीस
कबुतरांचे संरक्षण आणि नागरी आरोग्य यामध्ये संतुलन साधण्याचे प्रयत्न!
मैसूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा कोडवर्ड होता, शर्टचा फोटो!
ही परिस्थिती फक्त एका कंपनीची नाही. बर्कशायर हॅथवेचा नफा घटलेला नाही. अनेक कंपन्या दुखी आहेत. त्यांची विक्री घटलेली आहे. दोन कंपन्यांमध्ये खरेदी विक्रीचा सौदा ठरल्यानंतर माल जहाजात भरून अमेरिकेत येईल पर्यंत किती वेळा टेरीफ बदलले जाईल याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अनिश्चितता आहे. मुळातच अमेरिकेचे अर्थकारण संकटात असताना ट्रम्प हे अमेरिकेसाठी दुष्काळात तेरावा महिना बनले आहेत. जगभरातील तज्ज्ञ ट्रम्प यांच्या धोरणांवर उघड टीका करतायत.
नाईके, वॉलमार्ट, शेन, मॅकीज या कंपन्यांची अवस्था बिकट झाली आहे. कारण या कंपन्यांचा बराच माल भारत, चीन सारख्या देशांकडून येतो. व्हीएतनाम, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी अमेरिकेसोबत व्यापार करार केला असला तरी त्यांच्या मालावर अमेरिकेने टेरीफ लादले आहेत. त्यामुळे त्यांचा माल अमेरिकेत महागच ठरणार आहे. टेरीफमुळे वस्तूंचे दर वाढत असल्याची तक्रार या कंपन्यांनी केली आहे. ओरीयो, चिप्स अहोय सारख्या कित्येक प्रसिद्ध ब्रँडची मालकी असलेल्या मोन्डेलेज इंटरनॅशनलच्या विक्रीत प्रचंड घट झालेली आहे. कंपनीचे सीईओ डर्क वॅन द पुट म्हणालेत की लोक टेरीफच्या भीतीने लोक आता कमी खर्च करतायत.
जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी ट्रम्प यांच्याबद्दल अनेकदा म्हटलेले आहे, की मिकी माऊस ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट असतो. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका आणि जग अधिक गरीब बनेल.
ट्रम्प धमक्या देतायत, दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या वाटाघाटी बंद झालेल्या नाहीत. अमेरिकी शिष्टमंडळ २५ ऑगस्ट रोजी भारतात येणार असल्याची माहिती या शिष्टमंडळाचे सदस्य जेमिसन ग्रीर यांनी दिलेली आहे. म्हणजे वाटाघाटी आणि धमक्या एकत्रितपणे सुरू आहेत. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, हे भारताने स्पष्ट केलेले आहे. वाटाघाटीत आपल्या लक्ष्मण रेषाही स्पष्ट केल्या आहेत. त्या तुम्हाला ओलांडता येणार नाहीत, असे भारत वारंवार सांगतो आहे. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरीफ जाहीर केल्यानंतर ते जारी होणार होते १ ऑगस्ट रोजी. परंतु ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत सात दिवसांनंतर या लागू होणार असे जाहीर केले. ही मुदतही आता ८ ऑगस्टला संपेल. त्यानंतर ट्रम्प काय करतात हे पाहावे लागले. चीनच्या विरोधात अशाच गर्जना ट्रम्प यांनी केल्या होत्या. अखेर त्यांनाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन करून व्यापार कराराची घोषणा करावी लागली होती. ट्रम्प यांची गुरगुर कुणीही मनावर घेत नाही. बहुधा मिकी माऊस त्यांच्या पेक्षा स्मार्ट आहे, हे जेफ्री सॅक्स यांचे विधान जगाने गंभीरपणे घेतले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







