अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून बीजिंगमध्ये त्यांचे अत्यंत भव्य स्वागत करण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतः ट्रम्प यांचे स्वागत करत दोन्ही देशांतील संबंध नव्या टप्प्यावर नेण्याचे संकेत दिले. गेल्या काही वर्षांत व्यापार शुल्क, तैवान, तंत्रज्ञान आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवरून अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ येथे झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अनेक संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः व्यापार युद्धामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर झालेला परिणाम, अमेरिकन कंपन्यांना चीनमधील बाजारपेठेत मिळणाऱ्या संधी, तसेच सेमिकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर वाढलेला संघर्ष या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
हे ही वाचा:
कोलकाताचे माजी डीसीपी शंतनू सिन्हा बिस्वास यांना अटक
साखर निर्यातीवर बंदी; देशातील दर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय
दिल्लीत बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; चालक, वाहकाला अटक
‘मिनाब १६८’ विमानाने इराणचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत; ‘मिनाब १६८’ काय आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने अमेरिकन कंपन्यांसाठी अधिक खुले धोरण स्वीकारावे, अशी मागणी केली. त्याचवेळी चीननेही अमेरिकेकडून आयात शुल्क कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे या बैठकीतून दोन्ही देशांमध्ये नव्या व्यापार कराराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील नामांकित तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती ट्रम्प यांच्यासोबत चीनमध्ये दाखल झाले आहेत. त्यामध्ये इलॉन मस्क, टिम कुक आणि जेन्सेन हुआंग यांचा समावेश आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहनं आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका-चीन सहकार्य वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, तैवानचा मुद्दा या बैठकीतील सर्वात संवेदनशील विषय ठरला. चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला तैवानच्या प्रश्नात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट इशारा दिला. अमेरिकेकडून तैवानला होणाऱ्या शस्त्रविक्रीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमेरिका तैवानच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका कायम ठेवण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले.
याशिवाय इराण आणि मध्यपूर्वेतील वाढत्या तणावावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा आणि इंधन दरांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक स्थैर्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात सहकार्य आवश्यक असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले.
ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या या भेटीकडे जागतिक अर्थतज्ज्ञ, उद्योगजगत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या बैठकीत घेतले जाणारे निर्णय केवळ अमेरिका आणि चीनपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतात.







