२३ वर्षीय भारतीय वंशाचे तुषार कुमार ठरले ब्रिटनमधील सर्वात युवा महापौर

एल्स्ट्री आणि बोरेहमवुडच्या महापौरपदी नियुक्ती

२३ वर्षीय भारतीय वंशाचे तुषार कुमार ठरले ब्रिटनमधील सर्वात युवा महापौर

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे आणि हरियाणाशी संबंध असलेले २३ वर्षीय नगरसेवक तुषार कुमार यांनी इतिहास रचला आहे. तुषार हे ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे सर्वात युवा महापौर बनले आहेत. त्यांची एल्स्ट्री आणि बोरेहमवुडच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १३ मे रोजी बोरेहमवुड येथील फेअरवे हॉलमध्ये आयोजित मेयर-मेकिंग समारंभात तुषार कुमार यांनी अधिकृतपणे महापौरपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला अनेक नगरसेवक, सामाजिक नेते, विविध समुदाय संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.

समारंभानंतर तुषार कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “एल्स्ट्री आणि बोरेहमवुडचा महापौर बनणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. वयाच्या २३ व्या वर्षी ब्रिटनच्या इतिहासातील भारतीय वंशाचा सर्वात युवा महापौर बनणे अविश्वसनीय वाटते. किंग्स कॉलेज लंडनमध्ये पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेण्यापासून ते आता आपल्या आवडत्या शहराची सेवा करण्यापर्यंतचा हा प्रवास एखाद्या स्वप्नासारखा वाटतो.” आपल्या भाषणात तुषार कुमार यांनी सांगितले की, ते २० वर्षांचे असताना आणि किंग्स कॉलेज लंडनमध्ये पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेत असतानाच प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

‘लंडन डेली’च्या वृत्तानुसार, तुषार यांनी म्हटले की, एवढ्या कमी वयात महापौर होणे त्यांच्यासाठी अत्यंत विशेष आहे. यामुळे अधिकाधिक तरुण स्थानिक लोकशाही, समाजसेवा आणि समुदाय कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तुषार कुमार यांनी माजी महापौर कौन्सिलर डॅन ओजारो यांचेही आभार मानले. उपमहापौर म्हणून काम करताना डॅन ओजारो यांच्याकडून मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कौन्सिलर लिंडा स्मिथ यांना नवीन उपमहापौरपदी नियुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा देत, त्यांच्या सोबत मिळून परिसराची सेवा करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले. आपल्या राजकीय प्रवासात कायम साथ दिल्याबद्दल तुषार कुमार यांनी कुटुंबीय आणि मित्रांचेही आभार मानले.

हे ही वाचा:

पाकिस्तानने लक्ष्य केल्याचा दावा केलेले ‘भारतीय एअरबेस’ अस्तित्वातच नाहीत

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केजरीवालांसह ‘आप’च्या सहा नेत्यांना नोटीस

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील ‘गरीब नगर’च्या बेकायदा झोपड्या जमीनदोस्त

सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा!

भविष्यातील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “लोकांमध्ये राहणारा महापौर” बनण्याची त्यांची इच्छा असून, एल्स्ट्री आणि बोरेहमवुडमधील नागरिक व स्थानिक संस्थांशी सतत संपर्कात राहण्यावर त्यांचा भर असेल. “ज्या शहरावर मी प्रेम करतो, त्या शहराची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे,” असेही ते म्हणाले. केवळ २३ वर्षांच्या वयात महापौरपदी नियुक्ती झाल्याने तुषार कुमार यांची विशेष चर्चा होत आहे.

Exit mobile version