सौदी अरेबियातील मदीनाजवळ भीषण अपघात झाला असून यात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसची डिझेल टँकरशी धडक झाल्याने किमान ४२ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक जण हे हैदराबादचे असल्याचे वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार, सर्व ४२ लोक हे भारतातील हैद्राबादचे रहिवासी होते. बसमध्ये ४३ प्रवासी होते, अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली असून संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता मुफ्रीहाट परिसरात हा अपघात घडला. अपघातात बळी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार टँकरला धडकलेल्या बसमधील ४३ प्रवाशांमध्ये २० महिला आणि ११ मुले होती. या सर्व यात्रेकरूंनी मक्का येथे उमराहचे विधी पूर्ण केले होते आणि पुढील विधींसाठी ते मदीनाला जात होते.
सौदी अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांचा अचूक आकडा निश्चित केलेला नाही. वाचलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. आपत्कालीन पथके मदत कार्यात गुंतलेली असल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासन हाय अलर्टवर आहे. भारतीय दूतावास देखील माहिती गोळा करण्याचे काम करत आहे. हज आणि उमराह मंत्रालय आणि ट्रॅव्हल एजन्सीने अपघाताची पुष्टी केली आहे.
हेही वाचा..
बिहारमधील नव्या सरकारचा ‘या’ दिवशी होणार शपथविधी
पाक सैन्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या जम्मूतील ‘गौरी’ला मिळाली नवसंजीवनी!
नागरिकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे काय आहेत प्रयत्न ?
दिल्ली कार ब्लास्ट केस: तपास पोहोचला पश्चिम बंगालपर्यंत
तेलंगणा सरकारने सांगितले की ते रियाधमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. एका अधिकृत निवेदनात, राज्य सरकारने पुष्टी केली की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. तसेच त्यांना दूतावास अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, मक्काहून मदीनाला जाणारे ४२ हज यात्रेकरू बसमध्ये होते, ज्याला आग लागली. त्यांनी या भीषण अपघातानंतर केंद्राकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.







