इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री कार्ट्झ यांनी हिजबुल्लाहचे प्रमुख नाईम कासेम यांना उघड चेतावणी दिली आहे. सोमवारी (२ मार्च) जारी केलेल्या निवेदनात कार्ट्झ यांनी हिजबुल्लाह प्रमुखांना पुढील लक्ष्य म्हणून चिन्हित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
इराण- समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर गोळीबार करत तो इराणी सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला असल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना इस्रायल कार्ट्झ म्हणाले, “दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला इस्रायलवर गोळीबाराची मोठी किंमत मोजावी लागेल. हिजबुल्लाहचे सरचिटणीस, ज्यांनी इराणच्या दबावाखाली गोळीबाराचा निर्णय घेतला- ते आता निश्चित लक्ष्य आहेत.” कार्ट्झ यांनी इराणच्या नेतृत्वालाही थेट इशारा देत म्हटले, “जो कोणी खामेनेई यांच्या मार्गावर चालेल, तो लवकरच वाईट शक्तींच्या अपयशी सदस्यांसोबत नरकाच्या गर्तेत जाईल.”
दरम्यान, इराणी माध्यमांनी Iranian Red Crescent Society च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका- इस्रायल लष्करी हल्ल्यांच्या सुरुवातीपासून आतापर्यंत इराणमध्ये किमान ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी अधिकृत आकडा २०० च्या आसपास असल्याचे सांगितले जात होते. संघर्ष आता तिसऱ्या दिवशी दाखल झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले सुरू असताना, इराण समर्थित गटांकडून प्रत्युत्तरात्मक कारवाया देखील सुरू आहेत.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदी- कॅनेडियन पंतप्रधान मार्क कार्नी भेट किती महत्त्वाची?
नूर खान एअरबेससह पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी तळांवर अफगाणिस्तानचा हल्ला
इराण रिव्होल्यूशनरी गार्डचे मुख्यालय अमेरिकेकडून उध्वस्त!
जेन झीचे डिजिटल जग, सस्टेनेबिलिटी आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य
या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी अमेरिकन, इराणी आणि इस्रायली दूतावासांच्या परिसरात गस्त वाढवली आहे. राजनैतिक क्षेत्रात चोवीस तास अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.







