टाटा समूहाच्या एअरलाइन एअर इंडियाच्या एका विमानात पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. हाँगकाँगहून दिल्लीला येणारे AI३१५ विमान तांत्रिक बिघाडामुळे परतले. हे विमान देखील बोईंगचे ड्रीमलायनर ७८७-८ विमान होते. हे विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरले. विमानातील तांत्रिक बिघाडाचे खरे कारण अद्याप समजलेले नाही.
गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये अपघात झालेले एअर इंडियाचे विमान देखील ड्रीमलाइनर होते. बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर अहमदाबादहून लंडनला जात होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. विमानात एकूण २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या अपघातात २४१ लोकांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेतून एक प्रवासी सुखरूप बचावला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असताना आणखी एका विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सोमवारी (१६ जून) हाँगकाँगहून दिल्लीला येणारे AI३१५ विमान तांत्रिक बिघाडामुळे परतले. प्रवासादरम्यान पायलटला इंजिनमध्ये समस्या जाणवली आणि विमानतळाशी संपर्क साधल्यानंतर ते विमान पुन्हा हाँगकाँगला परतले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींचा सायप्रसमध्ये बिझनेस राउंडटेबल इव्हेंटमध्ये सहभाग
अहमदाबाद विमान अपघात : दुसरा ब्लॅक बॉक्सही सापडला
पंतप्रधानांचा सायप्रस दौरा परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
अहमदाबाद विमान अपघात : आतापर्यंत ८७ जणांचे डीएनए नमुने जुळले
दरम्यान, एक दिवस आधी, दिल्लीहून वडोदरा येथे जाणारे एअर इंडियाचे विमान (AI ८१९ ) देखील दिल्लीला परतले. रविवारी (१५ जून ) संध्याकाळी टेकऑफ केल्यानंतर लगेचच विमान आयजीआय विमानतळावर परत उतरवण्यात आले. विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये काही समस्या असल्याचा संशय येताच वैमानिकांनी ताबडतोब याची माहिती दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली. त्यांनी एटीसीकडे परत जाण्यासाठी आणि काळजीपूर्वक लँडिंग करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर परवानगी मिळताच विमान सुरक्षितपणे उतरले आणि कोणतीही घटना घडली नाही.







