पाकिस्तान सध्या आपल्या इतिहासातील सर्वात भीषण बुद्धिमत्ता गमावण्याच्या टप्प्यातून जात असल्याचे दिसून येत आहे. वाढती आर्थिक अराजकता आणि राजकीय अस्थिरता यामुळे केवळ दोन वर्षांत हजारो डॉक्टर, अभियंते आणि लेखापाल (अकाउंटंट्स) देश सोडून गेले आहेत.
अलीकडेच समोर आलेल्या सरकारी अहवालाने ही कठोर वास्तविकता उघड केली आहे. या अहवालानुसार, गेल्या २४ महिन्यांत पाकिस्तानमधून ५,००० डॉक्टर, ११,००० अभियंते, आणि १३,००० अकाउंटंट्स परदेशात स्थलांतरित झाले आहेत.
हे ही वाचा:
इस्लामी जमावाची संगीत कार्यक्रमावर दगडफेक; २० जण जखमी
पीएमयूवाई योजना : सबसिडी घेणाऱ्यांची संख्या १०.३५ कोटी
यंदा जगातील अनेक विद्यापीठे ठरली वादग्रस्त
वेंकटेश पावल्याने आरसीबाचा आनंद गगनात मावेना!
या परिस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये सरकारची खुलेआम खिल्ली उडवली जात असून, लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. अलीकडेच असिम मुनीर यांनी या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराला सकारात्मक रंग देण्याचा प्रयत्न करत याला ‘ब्रेन ड्रेन’ नव्हे तर ‘ब्रेन गेन’ असे संबोधले होते.
ब्रेन गेन’च्या दावा
मात्र, वास्तविक आकडेवारी असिम मुनीर यांच्या गोड गोड वक्तव्यांना छेद देत आहे. या अहवालाकडे लक्ष वेधले आहे पाकिस्तानचे माजी खासदार (सेनेटर) मुस्तफा नवाज खोखर यांनी.
त्यांनी स्थलांतराच्या आकडेवारीसह ट्वीट करत म्हटले, अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर आधी राजकारण दुरुस्त करा! पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा फ्रीलान्सिंग हब आहे. मात्र इंटरनेट बंदीमुळे १.६२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून २३.७ लाख फ्रीलान्सिंग नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.”
पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ एमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
२०२४ मध्ये तब्बल ७,२७,३८१ पाकिस्तानी नागरिकांनी परदेशात नोकरीसाठी नोंदणी केली.२०२५ मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) ही संख्या ६,८७,२४६ इतकी आहे.
चिंतेची बाब म्हणजे, हे स्थलांतर आता केवळ गल्फ देशांत मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तसेच, परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित ‘व्यावसायिक भिकाऱ्यां’पुरतेही हे संकट सीमित नाही.
आज उच्चशिक्षित, कुशल आणि पांढरपेशा व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान सोडत आहेत, जे देशाच्या भविष्यासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
२०११ ते २०२४ या कालावधीत पाकिस्तानमधून परिचारिकांच्या स्थलांतरात तब्बल २,१४४ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, ही प्रवृत्ती यंदाही सुरूच राहिली आहे.
सरकारकडून विमानतळांवर कडक निर्बंध
शिक्षित आणि पांढरपेशा व्यावसायिक मोठ्या संख्येने देश सोडत असल्यामुळे शहबाज शरीफ सरकारने विमानतळांवर नियंत्रण अधिक कडक केले आहे.
२०२५ मध्ये ६६,१५४ प्रवाशांना पाकिस्तानी विमानतळांवरून ‘ऑफलोड’ (परदेशात जाण्यापासून रोखण्यात) आले, जी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. यामागे तस्करी आणि भीक मागण्याच्या टोळ्यांबाबतची चिंता कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
याशिवाय, गल्फ देशांसह इतर राष्ट्रांतून दहा-दहा हजार पाकिस्तानी नागरिकांना भीक मागणे आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या आरोपांखाली हाकलून देण्यात आले आहे (डिपोर्ट करण्यात आले आहे).
व्यावसायिक भिकाऱ्यां’वर परदेश प्रवासबंदी
या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी ‘व्यावसायिक भिकारी’ तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रवाशांना परदेशात जाण्यास बंदी घालण्याची घोषणा केली.
असिम मुनीरवर टीकेची झोड
ताज्या स्थलांतर आकडेवारीनुसार डॉक्टर आणि अभियंते मोठ्या प्रमाणावर देश सोडत असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर उपरोध आणि टीकेची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी ऑगस्ट महिन्यात केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी प्रवासी नागरिकांना उद्देशून भाषण करताना असिम मुनीर यांनी परदेशगमनाला ‘ब्रेन ड्रेन’ न म्हणता ‘ब्रेन गेन’ असल्याचे विधान केले होते. आता मात्र हेच विधान त्यांच्या अडचणीचे ठरले आहे.
एका युजरने ट्वीट करत म्हटले, “या झेहनी मरीज (मानसिक रुग्ण) माणसाच्या मते हे ‘ब्रेन गेन’ आहे. तो याला ‘ब्रेन गेन’ म्हणतो… या लोकांचे अज्ञान इतक्या टोकाला पोहोचले आहे की ते देशासाठी मोठ्या आपत्तीचे कारण ठरू शकते. तरीही हे लोक याह्या खानप्रमाणे गर्वाने आणि आत्मविश्वासाने वावरताना दिसतात, जणू काही घडलेच नाही.”







