बलुच बंडखोरांनी पाक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवले; १२ सैनिक ठार

बोलानमधील शोरकंद भागात लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला

बलुच बंडखोरांनी पाक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवले; १२ सैनिक ठार

भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. या धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांवर दोन वेगवेगळे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये १४ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी बोलन खोऱ्यात रिमोट स्फोटक बॉम्बने पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवून दिले. या स्फोटात वाहनाचे तुकडे झाले आणि त्यात असलेले सर्व १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. याचा व्हिडीओही समोर आला आहे. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने (एसटीओएस) बोलानमधील माच येथील शोरकंद भागात लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला केला. या स्फोटात स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह सर्व १२ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर, दुसऱ्या एका हल्ल्यात बीएलएच्या बंडखोरांनी केचमधील कुलाग तिग्रान भागात पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी पथकाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दोन जवान ठार झाले. या हल्ल्यांनंतर, बलुच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते झियांद बलोच यांचे एक विधानही समोर आले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य चीनने बांधलेल्या प्रकल्पांचे संरक्षण करण्यात गुंतले आहे. हे पाकिस्तानचे सैन्य नाही तर एक व्यावसायिक गट आहे. लष्कराच्या गणवेशाचा अर्थ बदलला आहे, ते बंदरांचे रक्षण करत आहेत, कॉरिडॉरचे रक्षण करत आहेत, ज्यांच्याकडून कर्जे दिली गेली आहेत त्यांना समाधानी करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही पाकिस्तानी सैन्याविरुद्ध आमचे युद्ध सुरूच ठेवू.

हे ही वाचा : 

गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

ऑपरेशन सिंदूरवर खुश थरूर!

पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला

आता कुठे खेळ सुरू झालाय…

बलुचिस्तान हा अशांत प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात, राजकीय दुर्लक्ष, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि पाकिस्तानी राज्याकडून नैसर्गिक संसाधनांचे शोषण या कारणांमुळे फुटीरतावादी गटांनी दीर्घकाळापासून स्वातंत्र्याची मागणी केली आहे. या गटांचा असा युक्तिवाद आहे की, या प्रदेशातील प्रचंड खनिज संपत्तीचा फायदा केंद्र सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांना होतो, तर स्थानिक समुदाय गरीब आणि अविकसित राहत आहेत. यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढत आहे.

Exit mobile version