बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. शनिवारी (१० मे) संध्याकाळी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बंदी घातली आहे. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शेख हसीना यांच्यासाठी हा मोठा धक्का मानले जात आहे.
“यासंदर्भातील अधिकृत राजपत्र अधिसूचना पुढील कामकाजाच्या दिवशी जारी केली जाईल,” असे युनूस यांच्या कार्यालयाने सांगितले. देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) मध्ये सुरू असलेला खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
जुलै २०२४ च्या आंदोलनातील नेते आणि कार्यकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात खटला चालवणाऱ्या तक्रारदारांना आणि साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे युनुस सरकारने म्हटले आहे. युनूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयसीटी कायद्यातही बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे आता कोणत्याही राजकीय पक्षावर आणि त्यांच्या संघटनांवर कारवाई करता येणार आहे.
दरम्यान, १९४९ मध्ये स्थापना झालेल्या अवामी लीगवर आता बंदी घालण्यात आली आहे. शेख हसीना यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी झालेल्या जनउत्थानात अवामी लीगच्या अध्यक्षा आणि पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले. हसीना शेख सध्या भारतात आश्रय घेत आहेत. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.
हे ही वाचा :
‘भारताने ९० मिनिटांत ११ एअरबेस उद्ध्वस्त केले’
‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’
शस्त्रसंधी झाली; पण पाकला त्याआधी भारताने दिला मोठा दणका
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! शस्त्रसंधी तीन तासात मोडली, भारतीय लष्कराला अधिकार
मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीगचे जवळजवळ सर्व नेते आणि कार्यकर्ते सध्या लपून बसले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बांगलादेशचे माजी राष्ट्रपती अब्दुल हमीद यांचा शोध अजूनही सुरू असला तरी, ते गुरुवारी सकाळी त्यांच्या पत्नी आणि मेहुण्यांसह बँकॉकला रवाना झाले. गुरुवारी रात्री १० वाजता अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारांच्या निवासस्थान जमुनासमोर अवामी लीगवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सुरू झालेले निदर्शने अजूनही सुरूच आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयोजक नाहिद इस्लाम म्हणाल्या, “अंतरिम सरकारची पहिली जबाबदारी अवामी लीगवर बंदी घालण्याची होती. आम्ही सरकारच्या आत आणि बाहेरही ही मागणी केली आहे. पण आज नऊ महिन्यांनंतर, अवामी लीगवर बंदी घालण्यासाठी आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागत आहे.”







