व्हेनेझुएलामध्ये बुधवारी अवघ्या ४० सेकंदांच्या अंतराने झालेल्या ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या दोन शक्तिशाली भूकंपांनी देशात अभूतपूर्व हाहाकार माजवला. राजधानी काराकाससह उत्तरेकडील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती कोसळल्या असून बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून १,५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाने हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
भूकंपाचा सर्वाधिक फटका राजधानी काराकासजवळील किनारपट्टी भागाला बसला. विशेषतः ला ग्वायरा, काटिया ला मार आणि काराबालेडा या शहरांमध्ये अनेक बहुमजली इमारती काही क्षणांत जमीनदोस्त झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिक आक्रोश करत असल्याचे हृदयद्रावक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या भूकंपामुळे काराकासजवळील देशाचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या सिमोन बोलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाच्या धावपट्ट्या आणि इमारतींचे मोठे नुकसान झाल्याने मदतकार्यावरही परिणाम झाला. तरीही अमेरिकेने तातडीने शोध आणि बचाव पथके व्हेनेझुएलामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, अमेरिकेचा संरक्षण विभाग शोध आणि बचाव मोहिमेत सक्रिय मदत करणार आहे. “अनेक इमारती कोसळल्या असून ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. पुढील ७२ तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्याची संधी सर्वाधिक असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिगेझ यांनी या आपत्तीला “भीषण शोकांतिका” असे संबोधत ला ग्वायरा प्रदेशाला अधिकृतपणे आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. त्यांनी बचाव यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत संस्थेनेही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. संस्थेचे प्रमुख टॉम फ्लेचर यांनी सांगितले की, “आम्ही पूर्ण क्षमतेने मदतकार्य सुरू करत आहोत. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, संसाधने आणि मदतसाहित्य पाठवले जात आहे. ज्यांनी सर्वस्व गमावले आहे त्यांच्यापर्यंत शक्य तितक्या वेगाने पोहोचणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
संयुक्त राष्ट्रांच्या प्राथमिक अहवालानुसार, केवळ ला ग्वायरा प्रदेशातच १०० हून अधिक इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध रिटासोल पॅलेस आणि समुद्रकिनाऱ्यावरील एडवर्ड्स हॉटेल यांचाही समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असल्याने चिंता अधिक वाढली आहे. भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, व्हेनेझुएलापासून सुमारे १,००० मैलांहून अधिक अंतरावर असलेल्या ब्राझीलमधील मानाऊस शहरातही धक्के जाणवले. घाबरलेल्या नागरिकांनी घरे आणि कार्यालये सोडून रस्त्यावर धाव घेतली.
हे ही वाचा:
पुस्तकाच्या ‘कृष्ण’ नावावरून वादंग; एनसीईआरटीने दिले स्पष्टीकरण
बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू
बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी स्थानिक नेत्याला अटक
“पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा हेतू नव्हता”
दरम्यान, गुरुवारीही व्हेनेझुएलामध्ये आफ्टरशॉक्स सुरूच असल्याने बचाव मोहिमेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकल्याची शक्यता असल्याने बचाव पथके अत्यंत सावधगिरीने काम करत आहेत. या भीषण आपत्तीनंतर जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ८५ विशेष प्रशिक्षित बचाव कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने व्हेनेझुएलात पाठवण्याची घोषणा केली आहे. युरोपीय भागीदारांसह फ्रान्स आवश्यक ती सर्व मानवतावादी मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी व्हेनेझुएलातील जनतेप्रती तीव्र सहवेदना व्यक्त करत, आधीच आर्थिक आणि राजकीय संकटांचा सामना करणाऱ्या देशासाठी हा आणखी एक मोठा आघात असल्याचे म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मदतीची तयारी दर्शवली.
