28.2 C
Mumbai
Monday, June 29, 2026
घरबिजनेसब्लॅक फ्रायडे! आशियाई शेअर बाजारात हाहाकार

ब्लॅक फ्रायडे! आशियाई शेअर बाजारात हाहाकार

दक्षिण कोरियाचा कोस्पी ८.२% कोसळला

Google News Follow

Related

जागतिक आर्थिक बाजारपेठेसाठी शुक्रवारचा दिवस मोठा धक्कादायक ठरला. आशियाई शेअर बाजारात विक्रीचा असा त्सुनामी आला की दक्षिण कोरियाचा शेअर बाजार अक्षरशः कोलमडला. कोस्पी निर्देशांकात तब्बल ८.२ टक्क्यांची घसरण झाल्याने हा दिवस दक्षिण कोरियासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून नोंदवला गेला. केवळ काही तासांत अब्जावधी डॉलरची बाजारमूल्ये नाहीशी झाली, तर बाजारातील अस्थिरता इतकी वाढली की कोरिया एक्सचेंजला तब्बल २० मिनिटांसाठी व्यवहार स्थगित करावे लागले. विशेष म्हणजे, याच आठवड्यात ट्रेडिंग थांबवण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या मूल्यांकनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
हे ही वाचा:
स्टेट बँक घोटाळाप्रकरणी श्रीकांत भसींच्या विमा पॉलिसी जप्त

महिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

ऍपलचा दणका! मॅकबुक, आयपॅडच्या किंमतीत १ लाख रुपयांपर्यंत वाढ

ओमानजवळ जहाजावर हल्ला; होर्मुझमधील स्थलांतर मोहीम तात्पुरती स्थगित

दक्षिण कोरियाच्या बाजारातील घसरणीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे सेमीकंडक्टर कंपन्यांमधील मोठ्या प्रमाणावर झालेली विक्री. जगातील सर्वात मोठ्या मेमरी चिप उत्पादक कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स यांच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. गेल्या काही महिन्यांत AI क्रांतीमुळे चिप उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी आली होती. डेटा सेंटर, क्लाऊड कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह AI आणि हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगसाठी लागणाऱ्या चिप्सची मागणी वाढल्यामुळे या कंपन्यांचे बाजारमूल्य झपाट्याने वाढले होते. मात्र आता या कंपन्यांचे मूल्यांकन वास्तवापेक्षा अधिक वाढल्याची भावना निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली सुरू केली.

तंत्रज्ञान क्षेत्रातील घसरणीचा परिणाम वाहन उद्योग, स्टील आणि बायोटेक कंपन्यांवरही झाला. हुंडई मोटरचे शेअर्स ४.७७ टक्क्यांनी, किया कॉर्पचे ४.३० टक्क्यांनी, पोस्को होल्डिंग्सचे ५.७३ टक्क्यांनी, तर सॅमसंग बायोलॉजिक्सचे ३.१० टक्क्यांनी खाली आले. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने दक्षिण कोरियाचा बाजार पूर्णपणे लाल निशाणावर बंद झाला.

यामागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर झालेली माघार हेही महत्त्वाचे कारण ठरले. केवळ सकाळच्या व्यवहारातच विदेशी गुंतवणूकदारांनी २.७ ट्रिलियन वॉन, म्हणजेच सुमारे १.७ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचे शेअर्स विकले. जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढती अनिश्चितता, AI क्षेत्रातील जोखीम आणि वाढलेल्या मूल्यांकनामुळे परदेशी फंडांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

दक्षिण कोरियानंतर जपानच्या बाजारालाही या विक्रीच्या लाटेचा मोठा फटका बसला. मागील सत्रात विक्रमी उच्चांक गाठलेल्या निक्केई निर्देशांकात एका दिवसात ३.७ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ६९,७०४.८८ अंकांवर बंद झाला. या घसरणीचा सर्वाधिक फटका सॉफ्टबँक ग्रुपला बसला. कंपनीच्या शेअर्समध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

सॉफ्टबँकच्या शेअर्समधील या घसरणीमागे अमेरिकेतील AI क्षेत्राशी संबंधित एक मोठी बातमी कारणीभूत ठरली. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, OpenAI आपल्या बहुचर्चित IPOला २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या अंतर्गत चर्चेचा हवाला देत ही माहिती समोर आली. OpenAI मध्ये सॉफ्टबँकची मोठी गुंतवणूक असल्याने या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर तात्काळ झाला. AI क्षेत्रातील भविष्यातील नफ्याबाबतची अनिश्चितता वाढल्याने संपूर्ण टेक सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला.

दरम्यान, आशियातील घसरणीचे पडसाद अमेरिकन बाजारातही उमटू लागले आहेत. नॅसडॅक-१०० फ्युचर्स सुमारे ०.६ टक्के, तर एस अँड पी ५०० फ्युचर्स ०.२ टक्के घसरले आहेत. यामुळे वॉल स्ट्रीट कमकुवत सुरुवात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी अमेरिकन बाजारातही तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे मिश्र चित्र पाहायला मिळाले होते. डाऊ जोन्स निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी वाढला असला तरी एस अँड पी ५००मध्ये किरकोळ घसरण झाली, तर नॅसडॅक दबावाखाली राहिला. विशेष म्हणजे ॲपलच्या शेअर्समध्ये ६.१ टक्क्यांची घसरण झाल्याने संपूर्ण टेक क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला.

गेल्या दोन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात शेकडो अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. NVIDIA, AMD, Samsung, TSMC, Micron, OpenAI, Microsoft, Alphabet आणि Meta यांसारख्या कंपन्यांनी AI तंत्रज्ञानावर मोठा भर दिला आहे. मात्र या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष आर्थिक परतावा किती आणि किती कालावधीनंतर मिळणार, याबाबत आता गुंतवणूकदारांमध्ये साशंकता वाढू लागली आहे. AI क्षेत्रातील प्रचंड खर्च, वाढती स्पर्धा आणि भविष्यातील नफ्याबाबतचे प्रश्न यामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.

मायक्रॉन टेक्नॉलॉजीने नुकतेच अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक निकाल जाहीर केले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम फार काळ टिकला नाही. उलट AI क्षेत्रातील अतिमूल्यांकन, वाढलेली जोखीम आणि मोठ्या प्रमाणातील नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी एमएससीआय आशिया पॅसिफिक निर्देशांक आणि एस अँड पी ५०० हे दोन्ही निर्देशांक या तिमाहीतील पहिल्या मासिक घसरणीकडे वाटचाल करत आहेत.

भारतातील गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आज मोहरम निमित्त बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांना सुट्टी आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील या मोठ्या घसरणीवर भारतीय गुंतवणूकदार तातडीने प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. मात्र सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर जागतिक संकेतांचा प्रभाव भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी, सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स आणि विदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये सुरुवातीच्या सत्रात दबाव दिसू शकतो. त्यामुळे पुढील आठवडा भारतीय आणि जागतिक शेअर बाजारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून AI क्षेत्रातील घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांचा कल आणि अमेरिकन बाजाराची दिशा यावरच आगामी बाजाराची वाटचाल मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा