पाकिस्तानचे फील्ड मार्शल आणि लष्करप्रमुख असीम मुनीर सध्या अमेरिकेत आहेत. आज म्हणजेच १८ जून रोजी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार असल्याचे वृत्त आहे. ट्रम्प यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची यादी व्हाईट हाऊसने जाहीर केली आहे. या यादीत ट्रम्प आणि मुनीर यांच्यातील भेटीचा उल्लेख आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प आणि मुनीर दुपारच्या जेवणासाठी भेटणार आहेत.
विशेष म्हणजे, ट्रम्प आणि मुनीर यांचे जेवण कॅबिनेट रूममध्ये होणार आहे आणि त्याठिकाणी पत्रकारांना परवानगी नाकारण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दैनंदिन सार्वजनिक वेळापत्रकानुसार ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यातील भेट दुपारी १ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट रूममध्ये होणार आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्करी नेते त्यांच्या अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचीही भेट घेण्याची अपेक्षा आहे. रविवारी (१५ जून) पाच दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी वॉशिंग्टनला पोहोचलेले पाक प्रमुख मुनीर हे अमेरिकेशी धोरणात्मक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी, अशी चर्चा होती की पाकिस्तानी फील्ड मार्शल अमेरिकन आर्मी डे परेडमध्ये सहभागी होतील. तथापि, अमेरिकेने हे दावे अधिकृतपणे फेटाळून लावले. “हे खोटे आहे. कोणत्याही परदेशी लष्करी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते,” असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सुनावलं: भारत-पाक युद्धविरामात अमेरिकेचा काहीही सहभाग नाही
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ब्रिटन दौऱ्यावर
एअर इंडियाची फ्लाइट ज्वालामुखीच्या स्फोटामुळे परत दिल्लीत
पती कर्ज फेडण्यात अयशस्वी, सावकाराने पत्नीला झाडाला बांधत केली मारहाण!
दरम्यान, वॉशिंग्टनला पोहोचल्यावर मुनीर यांना पीटीआय समर्थकांचा सामना करावा लागला. पाकिस्तानी लोकांनी असीम यांना सामूहिक हत्यारा म्हटले. एका कार्यक्रमात त्यांचे स्वागत होत असताना, पीटीआय समर्थकांनी ‘मुनीर तुला लाज वाटावी’ अशा घोषणा दिल्या. इतकेच नाही तर काही लोक मुनीर यांच्या हॉटेलपर्यंत पोहोचले. हॉटेलसमोर एक मोबाईल व्हॅन उभी होती, ज्यावर लिहिले होते, ‘असीम मुनीर संपेल. पाकिस्तानात लोकशाही परत येईल.’ मुनीर वाटेत असतानाही पीटीआय समर्थक घोषणा देत राहिले.







