इराणविषयक धोरणावरून अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर एका नव्या अहवालामुळे दोन्ही मित्रदेशांतील संबंधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, पेंटागॉनच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) ने इस्रायलशी संबंधित प्रतिहेरगिरी (Counter-Intelligence) धोक्याची श्रेणी वाढवून ‘क्रिटिकल’ केली आहे. ही एजन्सीची सर्वात उच्च अंतर्गत जोखीम पातळी मानली जाते.
दोन विद्यमान आणि एका माजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी NBC न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय गेल्या काही आठवड्यांत घेण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेतील काही घटकांमध्ये इस्रायल ट्रम्प प्रशासनाच्या मध्यपूर्वविषयक अंतर्गत चर्चांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिंता वाढत आहे. एका विद्यमान अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, “अमेरिका इस्रायल दौऱ्यादरम्यान आधीपासूनच अतिरिक्त खबरदारी घेत असते.” इस्रायली गुप्तचर संस्थांची माहिती गोळा करण्याची पद्धत दीर्घकाळापासून आक्रमक मानली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अहवालानुसार, वरिष्ठ अमेरिकन अधिकारी इस्रायल भेटीदरम्यान ‘बर्नर फोन’, तात्पुरते संगणक आणि कडक संवाद सुरक्षा प्रोटोकॉल वापरतात. माजी राजनैतिक अधिकारी आणि गुप्तचर तज्ज्ञांच्या मते, संवेदनशील विषयांवरील चर्चा हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा इतर संभाव्य असुरक्षित ठिकाणी टाळली जाते. NBC च्या वृत्तानुसार, DIA ने सात पानांचा अंतर्गत मूल्यांकन अहवाल तयार केला असून त्यामध्ये इस्रायलच्या मानवी गुप्तचर (Human Intelligence) आणि तांत्रिक गुप्तचर क्षमतेला “क्रिटिकल स्तर” असे संबोधले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हा निर्णय एखाद्या एकाच घटनेमुळे नव्हे, तर अनेक घटनांच्या एकत्रित परिणामामुळे घेण्यात आला आहे.
तथापि, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील गुप्तचर माहितीची देवाणघेवाण पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, इस्रायलला भेट देणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय अधिक कठोर केले जाऊ शकतात. वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS) च्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष एमिली हार्डिंग यांनी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला “अत्यंत आक्रमक” असे वर्णन केले. त्या म्हणाल्या, “आम्ही काय करत आहोत याबद्दल त्यांना प्रचंड रस असतो.”
दुसरीकडे, वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. “इस्रायल अमेरिकन संस्थांविरोधात, विशेषतः अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुप्त माहिती गोळा करत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. इस्रायलच्या गुप्तचर कारवाया या त्याच्या शत्रूंवर केंद्रित असतात, मित्रदेशांवर नव्हे, असेही त्यांनी म्हटले. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानेही हा अहवाल चुकीचा असल्याचे सांगत, तो अंतर्गत घडामोडींची माहिती नसलेल्या लोकांच्या दाव्यांवर आधारित असल्याचे म्हटले. तथापि, विद्यमान आणि माजी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, मित्रदेशांमध्ये मर्यादित प्रमाणात गुप्तचर कारवाया होणे असामान्य नाही. मात्र, कथित इस्रायली हालचाली या स्वीकारार्ह मर्यादेपलीकडे जात असल्याचे दिसून येते.
हे ही वाचा:
दिल्ली अग्निकांड प्रकरणात स्वयंपाकी दोषी? केली अटक
मुंबईत सात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक अटकेत
दक्षिण २४ परगणा बॉम्बस्फोट प्रकरणी तृणमूलचे शौकत मोल्ला अटकेत
लंडनमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांना ‘कॉकरोच’ टिप्पणीवरून प्रश्न
हा संपूर्ण वाद अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात इराण धोरणावरून मतभेद वाढत असल्याची चर्चा आहे. एप्रिलमधील युद्धविरामानंतर ट्रम्प प्रशासन इराणसोबत व्यापक करार करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करत आहे. तर नेतन्याहू यांनी सार्वजनिकपणे तेहरान कोणत्याही कराराचे पालन करेल का, याबाबत शंका व्यक्त केली आहे. अहवालांनुसार, दोन्ही नेत्यांमधील अलीकडील दूरध्वनी संभाषण तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी नेतन्याहूंना “वेडे” (Crazy) असे संबोधल्याचा दावा काही वृत्तांत करण्यात आला आहे, ज्यामुळे दोघांमधील वाढत्या दुराव्याबाबतच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. अमेरिकन वृत्तसंस्था Axios च्या अहवालानुसार, बेरूतच्या दक्षिण भागावर संभाव्य इस्रायली हल्ल्यांच्या धमक्यांमुळे ट्रम्प नाराज होते.
