परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवार, ०७ डिसेंबर रोजी भारत-जपान फोरमच्या उद्घाटन सत्रात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विकसित होणारी जागतिक व्यवस्था आणि भारत-जपान सहकार्याची अनिवार्यता याबाबत चर्चा केली. एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “नवी दिल्लीमध्ये झालेल्या भारत-जपान फोरमच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन आनंद झाला. बदलत्या वर्ल्ड ऑर्डरवर आणि भारत-जपान यांच्यातील अधिक सखोल सहकार्याच्या गरजेवर चर्चा झाली.”
अधिकृत निवेदनानुसार, भारत-जपान फोरम हे भारतीय आणि जपानी नेत्यांना संवाद आणि सहकार्याद्वारे द्विपक्षीय आणि धोरणात्मक भागीदारीचे भविष्य घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ पुरवते. अनंत सेंटर आणि विदेश मंत्रालय यांनी हा फोरम आयोजित केला आहे. निवेदनात पुढे सांगितले आहे, “या फोरमचे उद्दिष्ट सहकार्य अधिक दृढ करणे, संधींचा लाभ घेणे, विचारांची देवाणघेवाण करणे, परस्पर विश्वास निर्माण करणे आणि भावी सहकार्यासाठी एक संयुक्त अजेंडा तयार करणे हे आहे.”
हेही वाचा..
एसआयआर: निवडणूक आयोगाने जारी केले बुलेटिन
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण, करिअरची संधी
बाबरी मशीद उभारू दिली नाही तर, डोक्याचा फुटबॉल करून खेळू!
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह रद्द
जपानमध्ये शुक्रवार, ०५ डिसेंबर रोजी भारताच्या राजदूत नगमा एम. मलिक यांनी जपानचे पर्यावरण मंत्री इशिहारा हिरोताका यांच्याशी भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या संधींबाबत चर्चा झाली. यापूर्वी, २३ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी२० समिटदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जपानी समकक्ष आणि पंतप्रधान साने ताकाइची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली होती आणि नवोन्मेष, संरक्षण आणि कौशल्य गतिशीलता या क्षेत्रांत दोन्ही देशांतील सहकार्य अधिक वाढवण्यावर भर दिला होता.
तसेच, २७ ऑक्टोबर रोजी विदेश मंत्री जयशंकर यांनी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे झालेल्या आसियान समिटदरम्यान त्यांच्या जपानी समकक्ष मोटेगी तोशिमित्सु यांची भेट घेतली होती. या भेटीत भारत-जपान संबंध वृद्धींगत करण्यावर चर्चा झाली आणि पुढील दशकासाठी संयुक्त दृष्टिकोन अंमलात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे ठरविण्यात आले. विदेश मंत्रालयानुसार, भारत-जपान संबंधांना वर्ष २००० मध्ये “वैश्विक भागीदारी”, २००६ मध्ये “धोरणात्मक आणि वैश्विक भागीदारी” आणि २०१४ मध्ये “विशेष धोरणात्मक आणि वैश्विक भागीदारी” असा दर्जा देण्यात आला. संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी ही भारत-जपान द्विपक्षीय संबंधांची एक महत्त्वाची कडी आहे. अलीकडच्या काळात धोरणात्मक मुद्यांवर वाढत्या सामंजस्यामुळे संरक्षण सहकार्य आणि परस्पर आदान-प्रदान अधिक बळकट झाले आहे आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेबाबत समान दृष्टीकोनामुळे या सहकार्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.







