“इराणला आठवडाभराची सुट्टी दिली”; ट्रम्प यांची उपरोधिक टिप्पणी

तणावादरम्यान पुन्हा दिला इशारा

“इराणला आठवडाभराची सुट्टी दिली”; ट्रम्प यांची उपरोधिक टिप्पणी

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (४ जुलै) आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी, “आम्ही इराणला त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी आठवडाभराची सुट्टी दिली, कारण आम्ही खूप चांगले आहोत,” अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्याचवेळी त्यांनी इराणने पुन्हा अमेरिकेला किंवा तिच्या मित्रदेशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.

वॉशिंग्टनमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांनी इराणविरोधातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अलीकडील युद्धात इराणच्या लष्करी आणि आण्विक क्षमतेला मोठा धक्का बसला असून, आता इराण शोककाळात आहे. यावेळी ट्रम्प म्हणाले, “आम्ही त्यांना त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी एक आठवडा दिला. कारण आम्ही चांगले लोक आहोत. पण त्यांनी जर पुन्हा अमेरिकेविरोधात किंवा आमच्या मित्रराष्ट्रांविरोधात काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्याची गंभीर किंमत चुकवावी लागेल.”

इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली असून हा कार्यक्रम अनेक दिवस चालणार आहे. तेहरानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे दर्शन ठेवण्यात आले असून त्यानंतर विविध शहरांमध्ये अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अखेरीस त्यांच्यावर मशहदमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी रशिया, चीन, पाकिस्तान, इराकसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. इराण सरकारने हा कार्यक्रम राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन म्हणून आयोजित केला असून, देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

तेहरानमध्ये सुरू असलेल्या अंत्यसंस्कारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी “अमेरिकेचा मृत्यू होवो” आणि “इस्रायलचा नाश होवो” अशा घोषणा देण्यात आल्या. काही निदर्शकांनी ट्रम्पविरोधी फलक आणि बॅनरही झळकावले. या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनाने मध्यपूर्वेतील आपल्या तळांवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे.

इराणच्या लष्करी नेतृत्वानेही अमेरिकेला आणि इस्रायलला पुन्हा इशारा दिला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल आणि कोणतीही आक्रमक कारवाई सहन केली जाणार नाही, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अद्याप कायम असून परिस्थितीवर जगाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!

तृणमूलच्या बंडखोर गटाने पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा

३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक

अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग

खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे इराणमध्ये शोककळा पसरली असताना दुसरीकडे ट्रम्प यांच्या उपरोधिक वक्तव्यामुळे अमेरिका-इराण संबंधांतील कटुता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांकडून परस्परांना दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव लवकर कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.

Exit mobile version