पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बंदी घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने बलुचिस्तानातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी येथील पाकिस्तान कोस्ट गार्डच्या तळावर आत्मघाती कमांडो हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात ३० हून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचा आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने अद्याप या मृतांच्या संख्येला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
बलुच लिबरेशन आर्मीने जारी केलेल्या निवेदनानुसार, हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक जिवानीतील पनवान कोस्ट गार्ड कॅम्पमध्ये घुसवून उडवला. हा आत्मघाती वाहनाद्वारे करण्यात आलेला स्फोट असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण सुरक्षा तळ उद्ध्वस्त झाला. त्यानंतर बलुच लिबरेशन आर्मीच्या ‘फतेह स्क्वाड’ या कमांडो पथकाने चारही बाजूंनी तळावर हल्ला चढवत उर्वरित सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात ३० हून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असाही दावा करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर बलुच लिबरेशन आर्मीच्या ‘हक्काल’ या मीडिया विंगने ४३ सेकंदांचा कथित व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक सुरक्षा तळात प्रवेश करताना आणि त्यानंतर प्रचंड स्फोट होताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
हे ही वाचा:
मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!
तृणमूलच्या बंडखोर गटाने पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा
३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक
“इराणला आठवडाभराची सुट्टी दिली”; ट्रम्प यांची उपरोधिक टिप्पणी
बलुच लिबरेशन आर्मीने मोठा दावा केला असला तरी पाकिस्तानच्या लष्कराने किंवा सरकारने अद्याप या हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तसेच, बलुच लिबरेशन आर्मीने सांगितलेल्या मृतांच्या संख्येलाही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे. खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून बलुच फुटीरतावादी संघटना आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू आहे. बलुच लिबरेशन आर्मीसारख्या संघटना बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा तळ, लष्करी तुकड्या आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवर यापूर्वीही अनेक हल्ले झाले आहेत.







