ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत २,७०० हून अधिक मृत्यू

४०% पेक्षा जास्त मृत्यूंसाठी हवामान बदल जबाबदार

ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत २,७०० हून अधिक मृत्यू

ब्रिटनमध्ये यंदाच्या मे आणि जून महिन्यात आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) इंग्लंड आणि वेल्समध्ये २,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष नव्या संशोधनातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, या मृत्यूंपैकी ४० टक्क्यांहून अधिक मृत्यू मानवनिर्मित हवामान बदलामुळे तापमानात झालेल्या वाढीशी संबंधित असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हा अभ्यास इम्पिरियल कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSHTM) आणि यूके मेट ऑफिसच्या संशोधकांनी संयुक्तपणे केला आहे. संशोधकांनी मे आणि जून २०२६ मधील तापमान, मृत्यूदर आणि हवामानातील बदलांचा अभ्यास करून अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज मांडला.

अभ्यासानुसार, मे आणि जूनमधील उष्णतेच्या लाटेमुळे झालेल्या सुमारे २,७०० अतिरिक्त मृत्यूंपैकी सुमारे १,१३० मृत्यू (सुमारे ४२%) हवामान बदलामुळे तापमान अधिक वाढल्याने झाले. जीवाश्म इंधनांच्या वाढत्या वापरामुळे वातावरणातील हरितगृह वायू वाढले आणि त्यामुळे तापमान नैसर्गिक पातळीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअस अधिक राहिल्याचा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे.

उष्णतेचा सर्वाधिक फटका ६५ वर्षांवरील नागरिकांना बसला. हृदयविकार, पक्षाघात, श्वसनाचे आजार आणि इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आढळले. अनेक मृत्यू थेट उष्माघातामुळे नव्हे, तर उष्णतेमुळे आधीपासून असलेल्या आजारांची तीव्रता वाढल्याने झाले.

यंदा मे महिन्यात ब्रिटनमध्ये ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली, तर जूनमध्येही अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. सलग उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला, काही रुग्णालयांमध्ये उपचार सेवांवरही परिणाम झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आषाढी वारीला गालबोट; जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

भायखळ्यात सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार

बँकॉकमध्ये पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला

ब्रिटनपुरतेच नव्हे, तर जूनच्या अखेरीस आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण युरोपमध्ये १० हजारांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्पेन आणि इतर देशांनाही या उष्णतेचा मोठा फटका बसला असून, वैज्ञानिकांनी यासाठी मानवनिर्मित हवामान बदलाला प्रमुख कारण मानले आहे.

या अभ्यासानंतर तज्ज्ञांनी सरकारांना उष्णतेच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. शहरांमध्ये उष्णतारोधक पायाभूत सुविधा, वृद्धांसाठी विशेष संरक्षण योजना, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

Exit mobile version