पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलकांवर कठोर कारवाईचे समर्थन मिळवण्यासाठी पाकिस्तान मोठा डाव आखत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुजफ्फराबाद मार्च’पूर्वी लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात घुसवण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचा दावा गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आंदोलन हिंसक झाल्याचे चित्र उभे करण्यासाठी दहशतवादी संघटनांच्या सदस्यांचा वापर करू शकते. आंदोलनात हिंसाचार घडवून आणल्यानंतर त्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्याची आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दडपशाही करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे. जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) या संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक आठवड्यांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन सुरू आहे. वीजदर कमी करणे, स्वस्त गहू, रोजगार, चांगले प्रशासन, अधिक राजकीय अधिकार आणि इस्लामाबादकडून होणाऱ्या कथित भेदभावाचा अंत अशा ३८ मागण्यांसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मुजफ्फराबादकडे मोठा मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता.
मुजफ्फराबाद मार्चच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सनी अश्रुधुराचा आणि गोळीबाराचाही वापर केल्याचे वृत्त आहे. या चकमकींमध्ये अनेक आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला वीजबिल, गव्हाच्या किमती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईविरोधात सुरू झालेले आंदोलन आता पाकिस्तानच्या प्रशासनाविरोधातील व्यापक जनआंदोलनात रूपांतरित झाले आहे. रावळकोट, मीरपूर, कोटली, बाग, हट्टीयान बाला आणि मुजफ्फराबादसह अनेक भागांत हजारो नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना अनेक दशकांपासून राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक विकास आणि मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निष्क्रियतेमुळे यूएनवरील विश्वास ढासळतोय
पुतिन यांना अण्वस्त्र वापरण्यापासून पंतप्रधान मोदींनी रोखले!
भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष
मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
१५ जुलैच्या प्रस्तावित ‘मुजफ्फराबाद मार्च’पूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी पाकिस्तान प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना, आंदोलनात दहशतवादी घुसवण्याच्या कथित योजनेच्या वृत्तामुळे या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष केंद्रित झाले आहे. तथापि, LeT आणि JeM कार्यकर्त्यांना आंदोलनात घुसवण्याच्या दाव्याची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
