रशिया-युक्रेन युद्धादरम्यान २०२२ च्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सामरिक अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून परावृत्त करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्टोझेव्स्की यांनी केला आहे. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन सामरिक संबंधांमुळे पंतप्रधान मोदी हे जगातील अशा काही मोजक्या नेत्यांपैकी आहेत, ज्यांच्या सल्ल्याकडे पुतिन गांभीर्याने पाहतात, असेही त्यांनी म्हटले.
भारत-पोलंड संयुक्त आर्थिक आयोगाच्या बैठकीनंतर सोमवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बार्टोझेव्स्की यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर अत्यंत आदरणीय नेते आहेत. भारताचे रशियन फेडरेशन आणि त्यापूर्वीच्या सोव्हिएत युनियनसोबत अनेक दशकांपासून घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी जे काही सांगतात, त्याकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन गांभीर्याने लक्ष देतात.” त्यांनी पुढे सांगितले की, युक्रेन युद्धातील अत्यंत नाजूक टप्प्यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रभावाचा वापर करून पुतिन यांच्यावर संयम बाळगण्याचा दबाव आणला. “२०२२ च्या अखेरीस पुतिन यांना सामरिक अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची होती. संघर्ष थांबवण्यासाठी पुतिन यांच्यावर प्रभाव टाकू शकणाऱ्या मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होतो,” असे ते म्हणाले.
बार्टोझेव्स्की यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदींच्या रशिया-युक्रेन युद्धातील मुत्सद्देगिरीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान मोदी यांनी पुतिन यांना “आजचे युग युद्धाचे नाही” असा स्पष्ट संदेश दिला होता. या विधानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल घेण्यात आली होती. त्यानंतर भारताने सातत्याने संवाद, मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण तोडग्याचा आग्रह धरला. रशियावरील पाश्चिमात्य निर्बंधांमध्ये सहभागी होण्यास भारताने नकार दिला, मात्र युद्ध संपवण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याची भूमिका कायम ठेवली.
हे ही वाचा:
भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष
मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
E20 धोरणावर दिशाभूल करणारे व्हिडिओ; मनीष कश्यपसह चार इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा
भारत-चीनला अमेरिकेकडून मिळणार दिलासा? ५००% ऐवजी १००% शुल्काचा प्रस्ताव
भारताने युद्धाच्या संपूर्ण काळात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की या दोन्ही नेत्यांशी संवाद कायम ठेवला. पंतप्रधान मोदी यांनी २०२४ मध्ये युक्रेनची राजधानी कीवला भेट देऊन झेलेन्स्की यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानंतरही विविध बहुपक्षीय परिषदांच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी संपर्क सुरू ठेवला आहे. तसेच रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवल्याबद्दल अमेरिका आणि युरोपीय देशांकडून भारतावर दबाव आणला जात असतानाही, भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत हे धोरण कायम ठेवले आहे. केंद्र सरकारने यामागे राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षेचा विचार असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.







