बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर इस्लामिक जिहादी गटांकडून हिंदू अल्पसंख्यकांवर वाढत चाललेली हिंसा आणि छळ याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. मानवाधिकार संघटना, धार्मिक संस्था आणि नागरी समाजातील नेत्यांच्या आघाडीने एक आपत्कालीन आंतरराष्ट्रीय आवाहन जारी करत संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, युरोपियन युनियन, भारत तसेच इतर जागतिक शक्तींनी तात्काळ आणि ठोस हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
‘हिंदूज अॅडव्हान्सिंग ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह’ (HAHRI) यांच्या नेतृत्वाखाली हे आवाहन जारी करण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या अंतरिम सरकारच्या काळात हिंदू समुदायाला व्यवस्थात्मक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अंतरिम सरकारचे नेतृत्व नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस करत आहेत. स्वाक्षरीकर्त्यांनी परिस्थितीचे वर्णन वांशिक आणि धार्मिक शुद्धीकरण (एथनिक अँड रिलिजस क्लिन्झिंग) असे केले असून, अल्पसंख्यक समुदायाच्या अस्तित्वावरच धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे. या पत्राला १५ देशांतील १२५ हून अधिक संघटना आणि व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आहे. HAHRI आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इशारा दिला आहे की आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळेत हस्तक्षेप केला नाही, तर बांगलादेशातील हिंदू समुदाय अधिकाधिक कडेला ढकलला जाईल किंवा त्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
पत्रात अलीकडील हिंसक घटनांचाही उल्लेख आहे. त्यात दीपू चंद्र दास यांच्या हत्येचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. खोट्या ईशनिंदेच्या आरोपांनंतर दीपू चंद्र दास यांना सार्वजनिकरित्या निर्दयपणे मारहाण करून ठार मारण्यात आले आणि नंतर झाडाला लटकवून जाळण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. पत्रात पुढे म्हटले आहे, “जागतिक हिंदू समुदाय या गोष्टीने हादरला आहे की बांगलादेशातील हिंदू दशकेभर सुरू असलेल्या छळाचे बळी ठरत आहेत, हे वास्तव स्वीकारण्यात अपयश आले आहे. १९४७ पूर्वी पूर्व पाकिस्तानमध्ये आणि १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्थापनेनंतरही हिंदू समुदायाला सातत्याने भेदभाव, हिंसा आणि जबरदस्तीने विस्थापन सहन करावे लागले. १९७१ च्या संघर्षादरम्यान हिंदूंना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर खास लक्ष्य करण्यात आले. अनेक ऐतिहासिक नोंदी आणि वाचलेल्या लोकांच्या साक्षी सामूहिक हत्याकांड, महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि हिंदू पुरुषांची योजनाबद्ध ओळख व हत्या यांचे दस्तऐवजीकरण करतात. हिंदूंची मंदिरे, घरे आणि व्यवसायांवर हल्ले झाले असून, सरकारी संरक्षणाअभावी ते इस्लामी कट्टरपंथीयांच्या दयेवर, सतत भीतीच्या छायेत जगत आहेत.”
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातून डाळींबही येत नाहीत, पण दहशतवादी येतात!
इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाने सुरक्षा मर्यादा ओलांडल्यास लष्करी कारवाई करणार
“डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या”
बांगलादेशसाठीचा टॅरिफ फास शिथिल! कर शुल्क १९% पर्यंत केले कमी
दरम्यान, बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. २०२४ मध्ये झालेल्या व्यापक आंदोलनांनंतर शेख हसीना सरकार सत्तेतून हटवले गेल्यानंतर ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक असेल. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान शेख हसीना सरकारचा सत्तापलट झाला आणि त्यांना पदत्याग करून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम प्रशासनाने कार्यभार स्वीकारला आहे.







