होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून इराण या मार्गावरील जल वाहतूक बंद केल्याने जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, इराणने भारताच्या जहाजांना या मार्गावरून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्याने भारतीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही या सामुद्रधुनीच्या आसपासच्या भागात अनेक भारताचा तिरंगा असलेली जहाजे उभी असून त्यात अनेक खलाशी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सांगितले आहे की होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात भारतीय ध्वज असलेली २२ जहाजे सध्या उपस्थित आहेत. या जहाजांवर ६११ खलाशी आहेत आणि मागील २४ तासांत कोणत्याही प्रकारच्या अपघाताची माहिती मिळालेली नाही. तसेच भारतीय ध्वज असलेले ‘जग लाडकी’ हे जहाजही १४ मार्च रोजी युएईमधून रवाना झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की ‘शिवालिक’ एलपीजी कॅरियर, जे पर्शियन आखातामधून रवाना झाले होते, ते हॉर्मुज सामुद्रधुनी पार करून भारताकडे निघाले आहे. त्यांनी पुढे सांगितले की जहाज बंदरात पोहोचण्यापूर्वीच सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया आणि इतर व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत, जेणेकरून या जहाजावरील माल उतरवण्यात कोणताही विलंब होऊ नये.
सिन्हा यांनी विश्वास दिला की, आखातातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. त्यांनी सांगितले, “मागील २४ तासांत कोणत्याही प्रकारची घटना घडल्याची माहिती मिळालेली नाही आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक जहाज आणि त्यावरील क्रू सदस्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. पर्शियन आखातात होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अजूनही भारतीय ध्वजाची २२ जहाजे आहेत, ज्यावर ६११ भारतीय खलाशी कार्यरत आहेत.”
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर १२.६८ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
सलमानच्या “बॅटल ऑफ गलवान”चे नाव बदलून “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस”
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपी आणि मुख्य सचिवांना हटवले
युद्धादरम्यान दिशाभूल करणारी सामग्री शेअर केल्याबद्दल युएईमध्ये १९ भारतीयांना अटक
सिन्हा यांनी सांगितले की यूएईमधून निघालेले जहाज १७ मार्च पर्यंत कच्चे तेल घेऊन भारतात पोहोचेल. त्यांनी सांगितले, “भारतीय ध्वजाचे जहाज ‘जग लाडकी’ १४ मार्च रोजी यूएईमधून रवाना झाले असून ते सुमारे ८१ हजार टन कच्चे तेल घेऊन भारताकडे निघाले आहे. जहाज आणि त्यावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. हे जहाज उद्या मुंद्रा बंदरात पोहोचेल.”







