स्वतःहून अमेरिका सोडत असाल, तर १,००० डॉलर्स देऊ!

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाकडून घोषणा

स्वतःहून अमेरिका सोडत असाल, तर १,००० डॉलर्स देऊ!

ट्रम्प प्रशासनाने सत्तेत येताचं अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम उघडली. याविरोधात कारवाई करताना ट्रम्प प्रशासनाने आता नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. स्वतःहून अमेरिका सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या स्थलांतरितांना प्रवास खर्चात मदत करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने १,००० डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) सोमवारी याची घोषणा केली.

डीएचएसच्या मते, कायदेशीर परवानगीशिवाय अमेरिकेत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यासाठी, ताब्यात ठेवण्यासाठी आणि हद्दपार करण्यासाठी सुमारे १७,००० डॉलर्सचा खर्च येतो. त्या तुलनेत, स्वेच्छेने निघण्यासाठी थोडे पैसे देणे आणि प्रवास खर्च भागवणे खूपच स्वस्त आहे. “जर तुम्ही येथे बेकायदेशीरपणे असाल, तर अटक टाळण्यासाठी युनायटेड स्टेट्स सोडण्याचा निर्णय हा सर्वोत्तम, सुरक्षित आणि सर्वात किफायतशीर मार्ग आहे,” असे होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

२० जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने १,५२,००० लोकांना हद्दपार केले आहे. गेल्या वर्षी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत हद्दपार केलेल्या १९५,००० लोकांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. ट्रम्प यांनी लाखो लोकांना हद्दपार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आतापर्यंत ही संख्या बायडेन प्रशासनाच्या काळातील तुलनेत कमी आहे.

अधिकाधिक बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लोकांनी स्वतः देश सोडून जावे यासाठी ट्रम्प प्रशासनाने इतरही पावले उचलली आहेत. यामध्ये मोठ्या दंडात्मक कारवाईचा इशारा देणे, कायदेशीर दर्जा काढून घेण्याचा प्रयत्न करणे आणि स्थलांतरितांना ग्वांटनामो बे आणि एल साल्वाडोरमधील कुप्रसिद्ध तुरुंगात पाठवणे असे उपाय समाविष्ट आहेत.

हे ही वाचा : 

पाकची लाज निघाली; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ना ठराव आला ना निवेदन

मॉक ड्रील घ्या, सायरन वाजवा! उद्या देशात होणार युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’

भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय

‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या…

राष्ट्रपती ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये या योजनेबद्दल सांगितले होते की, काही स्थलांतरितांना नंतर परत येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. “जर ते चांगले असतील, जर आम्हाला त्यांना परत हवे असेल, तर आम्ही त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्यासाठी त्यांच्यासोबत काम करू,” असे ते म्हणाले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान लाखो कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते.

Exit mobile version