पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इम्रान खान यांनी तब्बल ९ महिन्यांनंतर पत्नी बुशरा बीबी आणि बहिण नोरीन नियाझी यांची भेट घेतली. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात ही भेट झाली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने कुटुंबीयांना साप्ताहिक भेटीची परवानगी दिल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला.
इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी महत्त्वाचे निर्देश दिले. न्यायालयाने खान यांना वैद्यकीय तपासणीसाठी इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे आदेश दिले. तसेच कुटुंबीयांना दर आठवड्याला भेटण्याची आणि त्यांच्या मुलांशी फोनवरून संवाद साधण्याची परवानगी देण्याचे निर्देशही देण्यात आले.
नोरीन नियाझी यांनी अदियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतली. ही भेट सुमारे १५ मिनिटे चालली. यावेळी त्यांनी खान यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रुग्णालयात हलवण्याच्या आदेशाची माहिती दिली. तसेच त्यांच्या काही कायदेशीर प्रकरणांवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचारासह विविध प्रकरणांमध्ये कारवाई सुरू असून, खान आणि त्यांच्या समर्थकांनी या खटल्यांना राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या रुग्णालयात हलवण्याच्या आदेशाला पाकिस्तान सरकारकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. कायदामंत्री आझम नजीर तरार यांनी खान यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी भूमिका घेतली असून, कैद्यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यासंदर्भातील नियमांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण
जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे
भारतीय कार बाजाराला वेग! FY31 पर्यंत ६३ लाख वाहनांची विक्री शक्य
आयएसआय कनेक्शन असलेल्या वहाब आलमच्या तिसऱ्या साथीदाराला बेड्या
इम्रान खान यांच्या आरोग्याबाबतचा मुद्दा आणि कुटुंबीयांच्या भेटीवर असलेले निर्बंध यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आधीपासूनच तणावाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर खान यांना वैद्यकीय उपचार आणि कुटुंबीयांशी संपर्काच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्या तुरुंगवासाचा आणि संबंधित खटल्यांचा प्रश्न कायम आहे.
