भारत आणि मलेशिया यांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी रविवार (८ फेब्रुवारी) रोजी कुआलालंपूर येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधांचे कौतुक करत “अतिशय विशेष नाते” असे संबोधले. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चा पूर्ण झाली.
पंतप्रधान मोदी २०२६ मधील आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर मलेशियात पोहोचले असून, अनिश्चित जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आशियासोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-मलेशिया संबंध खरोखरच अतिशय विशेष आहेत. आम्ही समुद्री शेजारी आहोत. शतकानुशतके दोन्ही देशांतील लोकांमध्ये खोल संबंध राहिले आहेत. आज मलेशिया हा भारतीय वंशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आमच्या सभ्यता समान सांस्कृतिक वारसा आणि लोकशाही मूल्यांनी जोडलेल्या आहेत.”
अलिकडच्या वर्षांत द्विपक्षीय संबंधांना मिळालेल्या गतीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आमच्या संबंधांनी नवी गती घेतली आहे. माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी यात विशेष योगदान दिले आहे. ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्य मजबूत झाले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की डिजिटल अर्थव्यवस्था, बायोटेक आणि आयटीमध्ये परस्पर गुंतवणूक वाढली आहे; पर्यटन तसेच लोक-ते-लोक संपर्क अधिक दृढ झाले आहेत. या उपलब्धींमुळे प्रेरित होऊन भागीदारीला अभूतपूर्व गती आणि खोली देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षा सहकार्यावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सुरक्षा क्षेत्रात आम्ही दहशतवादविरोधी कारवाई, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि समुद्री सुरक्षेतील सहकार्य अधिक मजबूत करू. संरक्षण सहकार्यालाही अधिक व्यापक स्वरूप देण्यात येईल. एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानासह सेमीकंडक्टर, आरोग्य आणि अन्नसुरक्षेत आमची भागीदारी आणखी पुढे नेऊ. आज झालेल्या CEO फोरममुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. धोरणात्मक विश्वासाच्या आधारे आर्थिक परिवर्तनाचा मार्ग आम्ही प्रशस्त करू.”
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक करताना म्हणाले, “भारत वेगाने प्रगती करत आहे; आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात ही एक उल्लेखनीय झेप आहे.” त्यांनी सांगितले की आसियानच्या संदर्भात मलेशिया भारतासोबत सहकार्य वाढवून २०२५ मध्ये झालेल्या १८.५९ अब्ज डॉलर्सच्या व्यापारापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवणे आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य यावरही त्यांनी भर दिला.
हे ही वाचा:
५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ३२ व्या अव्हेन्यूच्या सीईओला अटक
गाझियाबाद तीन बहिणींचा मृत्यू: वडिलांच्या २०१५ च्या लिव्ह- इन पार्टनरने केली होती आत्महत्या
भारत–अमेरिका व्यापार कराराला मोठी चालना
भारताचे सर्वात मोठे भांडवल ‘विश्वास’
पंतप्रधान मोदी यांच्या शांतता स्थापनेबाबतच्या कटिबद्धतेवर ते म्हणाले, “या संधीवर मी पंतप्रधान मोदी यांचे जगभरातील शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्यासाठी- यूक्रेन-रशिया असो किंवा मध्यपूर्व, विशेषतः गाझाचा मुद्दा- मनापासून आभार मानतो. शांतता प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा त्यांचा हेतू नेक आहे आणि त्याबद्दल त्यांची प्रशंसा करायलाच हवी.” दोन्ही देशांतील चांगल्या संबंधांचे प्रतीक म्हणून कोटा किनाबालू येथे भारताचे दूतावास उघडण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला त्यांनी सहमती दिली.
“ही बैठक आणि हे आदान-प्रदान भारत-मलेशिया संबंध पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, धोरणात्मक आणि निर्णायक आहेत,” असे अन्वर इब्राहिम म्हणाले. त्यांनी सांगितले की १९५७ पासून सुरू असलेल्या संबंधांना २०२४ मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आला असून, आता व्यापार, गुंतवणूक, सेमीकंडक्टर, डिजिटल अर्थव्यवस्था, ऊर्जा, कृषी, सुरक्षा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रांत ते अधिक सखोल केले जातील.







