सरत्या वर्षाच्या अखेरीस भारताने दमदार कामगिरी केली असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे.
सरकारच्या निवेदनानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले असून देशाचा जीडीपी ४.१८ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका आहे. २०३० पर्यंत जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज आहे. मजबूत देशांतर्गत मागणी आणि सातत्याने होत असलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरला आहे.
आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला जो मागील सहा तिमाहीतील उच्चांक आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेनंतरही ही वाढ नोंदवली गेली. २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या अमेरिका पहिल्या, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा:
एका दिवसातच चांदीत १२,००० रुपयांची वाढ
हार्दिक पांड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या वाढीबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे:
जागतिक बँक: २०२६ मध्ये ६.५% वाढ
आयएमएफ: २०२५ मध्ये ६.६%, २०२६ मध्ये ६.२%
मूडीज, OECD, S&P, ADB आणि Fitch: पुढील दोन वर्षांत ६.४% ते ७.४% दरम्यान वाढीचा अंदाज
सरकारने स्पष्ट केले की, महागाई नियंत्रणात आहे, बेरोजगारी कमी होत आहे, निर्यातीत सुधारणा होत आहे आणि आर्थिक परिस्थिती स्थिर आहे. व्यावसायिक क्षेत्रात मजबूत कर्जपुरवठा आणि वाढती शहरी खपत यामुळे आर्थिक गती टिकून आहे. २०४७ पर्यंत उच्च मध्यम-उत्पन्न देश बनण्याच्या उद्दिष्टाकडे भारत भक्कम पायाभरणीवर वाटचाल करत आहे.







