भारत रशियासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे विधान भारतातील रशियन दूतावासाचे प्रतिनिधी रोमन बाबुश्किन यांनी बुधवारी(दि.२०) केले. रशियाचे हे विधान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमक्यांदरम्यान दोन्ही देशांतील दृढ होत चाललेल्या संबंधांचे प्रतिबिंब आहे. ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीसाठी भारतावर टॅरिफ लागू केले आहेत.
भारतातील रशियन दूतावासाचे प्रतिनिधी रोमन बाबुश्किन यांनी एका पत्रकार परिषदेत रशियन तेल खरेदीवर भारतावर लादलेल्या अमेरिकन टॅरिफची टीका केली आणि म्हटले की अमेरिकेचा हा दबाव चुकीचा आणि एकतर्फी आहे. ते म्हणाले, “जर पाश्चिमात्य देश तुमची टीका करत असतील, तर याचा अर्थ तुम्ही सर्व काही बरोबर करत आहात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी टेलिफोनवर चर्चा केली होती. या संवादात रशिया-युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताने सातत्याने युक्रेन संघर्षाच्या शांततामय तोडग्याचे समर्थन केले आहे.
भारताची भूमिका ही अमेरिका आणि रशिया यांच्याशी संतुलन राखण्याची राहिली आहे. जिथे अमेरिका हा भारताचा मोठा व्यापारिक आणि रणनीतिक भागीदार आहे, तिथे रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. त्यामुळेच भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
अमेरिकेने गेल्या काही वर्षांत आर्थिक निर्बंधांना एक शस्त्र म्हणून वापरले आहे. बाबुश्किन यांचे म्हणणे आहे की यामुळे डॉलरवरील जागतिक विश्वास कमी होत आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, रशिया कधीच भारतावर निर्बंध लादणार नाही आणि ना त्याच्यावर कोणताही आर्थिक दबाव आणणार. त्याऐवजी, रशियाने भारतासाठी कच्च्या तेलाच्या सतत पुरवठ्यासाठी विशेष प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे ही भागीदारी अमेरिकेच्या दबावापासून मुक्त राहू शकेल.
बाबुश्किन यांनी याचीही माहिती दिली की, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यावर्षाच्या शेवटी भारताचा दौरा करतील आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतील. ही भेट भारत-रशिया संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकते.त्याचबरोबर, रशियाने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भारत यात्रा अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगितले आणि लवकरच भारत-रशिया-चीन यांच्यात त्रिपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा व्यक्त केली. हा त्रिपक्षीय सहकार्य उपक्रम आशियातील भू-राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.







