पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. चार दिवस चाललेल्या या संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्यात आला आणि युद्धबंदी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केल्याचा दावा केला. भारताने हा दावा फेटाळून लावला. यानंतर लष्करी संघर्षादरम्यान नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा चीननेही केला. चीनचा हा दावा भारताने ठामपणे फेटाळून लावला आहे.
भारत- पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयात कोणताही तृतीय पक्ष सहभागी नव्हता हे पुन्हा भारताने स्पष्ट केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर १० मे रोजी दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात थेट चर्चेनंतर युद्धबंदी झाली होती, असे भारताने सातत्याने म्हटले आहे. “आम्ही अशा दाव्यांचे आधीच खंडन केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर, तिसऱ्या पक्षाची कोणतीही भूमिका नाही. भारत- पाकिस्तान युद्धबंदीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये थेट सहमती झाली होती, असे आमचे म्हणणे यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे,” असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
ट्रम्पनंतर आता चीन म्हणतो आम्ही भारत- पाक युद्ध थांबवले
एका दिवसातच चांदीत १२,००० रुपयांची वाढ
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणावासह अनेक जागतिक संघर्षांमध्ये बीजिंगने मध्यस्थी केल्याचा दावा केल्यानंतर ही घटना घडली आहे. या वर्षी, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कधीही न झालेल्या वेळेपेक्षा जास्त वेळा स्थानिक युद्धे आणि सीमापार संघर्ष भडकले, असे वांग यी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले. ते पुढे म्हणाले की, शाश्वत शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात चीनने लक्षणे आणि मूळ कारणे दोन्हींवर लक्ष केंद्रित करताना वस्तुनिष्ठ आणि तटस्थ भूमिका घेतली आहे. आम्ही उत्तर म्यानमार, इराणी अणुप्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील मुद्दे आणि कंबोडिया आणि थायलंडमधील अलिकडच्या संघर्षात मध्यस्थी केली, असे चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर चीनने या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. चीनचा हा पहिलाच दावा असला तरी, ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा हा दावा केला आहे.







