पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ३० लोक ठार झाले. विशेष म्हणजे हे सर्व सामान्य नागरिक असून पाकिस्तानने स्वतःच्या भूभागावरचं हवाई हल्ला केला होता. याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली. तसेच भारताने पाकिस्तानवर भारताविरुद्ध निराधार आणि चिथावणीखोर विधाने करून या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा आरोपही केला.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ६० व्या सत्रात बोलताना जिनेव्हा येथील भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक क्षितिज त्यागी म्हणाले की, दहशतवाद्यांची निर्यात करण्यापासून, संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून आणि स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला तर पाकिस्तानने आमच्या भूभागाची हाव बाळगण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या बेकायदेशीर कब्जाखालील भारतीय भूभाग रिकामा करून स्वतःची अर्थव्यवस्था, लष्करी वर्चस्वामुळे गोंधळलेली राज्यव्यवस्था आणि छळामुळे कलंकित झालेला मानवी हक्कांचा रेकॉर्ड वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल, असा सणसणीत टोला त्यागी यांनी पाकिस्तानला लगावला.
हेही वाचा..
न्यू यॉर्कमध्ये मोबाईल नेटवर्क ठप्प करून संपर्क यंत्रणा बिघडवण्याचा कट उधळला
आप नेते सत्येंद्र कुमार जैन यांची ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त
आसाममधून ३७ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले!
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळीराजाला २२१५ कोटींची मदत
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिरह व्हॅलीमधील मात्रे दारा गावात पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतरच त्यांनी ही टीका केली. स्थानिक पोलिस अधिकारी जफर खान यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अमन गुल आणि मसूद खान हे दोन तालिबानी कमांडर या जागेचा वापर लपण्याचे ठिकाण आणि बॉम्ब बनवण्याची सुविधा म्हणून करत होते. पाकिस्तान सरकारने अद्याप या घटनेवर कोणतेही निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. तिरहमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, जेट विमानांनी चार घरांवर हल्ला केला, परंतु हल्ला कोणी केला हे ओळखले नाही.







