इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतातून इराणला होणारी तांदळाची निर्यात जवळजवळ थांबली आहे. त्यामुळे तांदळाचे व्यापारी चिंतेत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, इराणला भारतीय तांदळाचा पुरवठा थांबल्यामुळे प्रति किलो तांदळाच्या किमतीत १० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, सुक्या मेव्याच्या किमतीही वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातून ‘बासमती सेला’ तांदळाचा सर्वाधिक पुरवठा इराणला होतो. परंतु इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे गेल्या चार दिवसांपासून भारतातून होणारा तांदळाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे तांदळाच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. नया बाजार येथील तांदळाचे व्यापारी सचिन शर्मा म्हणाले की, तांदूळ उद्योगात भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या या युद्धानंतर इराणमध्ये बासमती सेलाचा पुरवठा थांबला आहे.







