इस्रायलने शनिवारी इराणविरोधात प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याची घोषणा केली. या कारवाईदरम्यान तेहरानमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकराराच्या मुद्द्यावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती आधीच तणावपूर्ण असताना संभाव्य अमेरिकन हल्ल्याच्या चर्चाही सुरू होत्या. इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनी यांच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर खामेनी यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जम्हुरी परिसरात काही क्षेपणास्त्रे कोसळली. तसेच मध्यवर्ती पाश्चर स्ट्रीट परिसरातून दाट धूर निघताना दिसला. विविध वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेहरानमधील महत्त्वाच्या ३० जागांवर हे हल्ले झालेले आहेत. इराणच्या गुप्तचर मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले आहे. तेहरानमध्ये असलेली सगळी संरक्षण दलाची केंद्र लक्ष्य करण्यात आली आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू होती पण त्यातून कोणतेही निष्पन्न निघाले नाही. शेवटी हे हल्ले केले गेल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून सगळ्या शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात सायरन वाजू लागले आहेत. लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करी तळ उडवले!
जेन झी मध्ये आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि नवे ट्रेंड
बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर ‘धुरंधर’चा जलवा! आठ देशांमध्ये पहिल्या १० च्या यादीत
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कार्ट्स यांनी निवेदनात सांगितले की, ही कारवाई इराणकडून निर्माण होणारा धोका निष्प्रभ करण्यासाठी करण्यात आली. “इस्रायल राष्ट्राने आपल्या सुरक्षेसाठी इराणविरोधात प्रतिबंधात्मक हल्ला केला आहे,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने देशातील विविध भागांत हवाई हल्ला इशारा सायरन वाजवण्यात आल्याचे सांगितले. संभाव्य प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने शैक्षणिक उपक्रम, सार्वजनिक सभा आणि अनेक कार्यस्थळांवर तात्पुरती बंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र या निर्बंधांमधून वगळण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पुढील घडामोडींकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.







