पाकिस्तानची डबल ढोलकी, इराणला हवाई तळ दिला!

तैनात असलेल्या विमानांमध्ये इराणी हवाई दलाच्या RC-130 टेहळणी विमानाचाही समावेश

पाकिस्तानची डबल ढोलकी, इराणला हवाई तळ दिला!

अमेरिका – इराण यांच्यात युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तान स्वतःला तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील एक राजनैतिक मध्यस्थ म्हणून जाहीरपणे सादर करत आहेत. अशातच इराण आणि अमेरिका यांच्यातील अलीकडील संघर्षादरम्यान पाकिस्तानने इराणी लष्करी विमानांना आपल्या एका प्रमुख हवाई तळावर उभे राहण्याची परवानगी दिल्याचे समोर आले आहे. ‘सीबीएस न्यूज’च्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने यासंबंधी वृत्त दिले आहे.

या प्रकरणाशी संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर लगेचच इराणने लष्करी मालमत्तेसह अनेक विमाने रावळपिंडीजवळील पाकिस्तान हवाई दल तळ नूर खान येथे हलवली. तिथे तैनात असलेल्या विमानांमध्ये इराणी हवाई दलाच्या RC-130 टेहळणी विमानाचाही समावेश होता, जे लॉकहीड C-130 हर्क्युलस वाहतूक विमानाचे निगराणीसाठी वापरले जाणारे एक प्रकार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रादेशिक तणाव वाढत असताना संभाव्य अमेरिकन हल्ल्यांपासून इराणच्या उर्वरित हवाई आणि लष्करी मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही विमान हालचाल केली जात असल्याचे दिसून येते. या अहवालावर प्रतिक्रिया देताना, अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक्सवर लिहिले, “जर हे वृत्त अचूक असेल, तर इराण, अमेरिका आणि इतर पक्षांमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तान जी भूमिका बजावत आहे, तिचे पूर्णपणे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरेल.”

मात्र, एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने नूर खान हवाई तळाशी संबंधित आरोप फेटाळून लावले आणि सीबीएस न्यूजला सांगितले की, हा तळ दाट लोकवस्तीच्या शहरी भागात असल्यामुळे अशा कारवाया लपून राहू शकत नाहीत.

आणखी काही वृत्तांनुसार, इराणने शेजारील अफगाणिस्तानमध्ये नागरी विमानेही पाठवली आहेत. दोन अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, त्या उड्डाणांमध्ये लष्करी विमानांचा समावेश होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अफगाण नागरी हवाई वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितले की, संघर्ष सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी महान एअरचे एक विमान काबूलमध्ये उतरले आणि इराणी हवाई हद्द बंद झाल्यानंतरही ते तिथेच थांबले. अफगाणिस्तानातील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे काबूल विमानतळ लक्ष्य बनू शकते अशी भीती निर्माण झाल्यानंतर, नंतर ते विमान इराणी सीमेजवळील हेरात विमानतळावर हलवण्यात आले. तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी अफगाणिस्तानमध्ये इराणी विमाने असल्याच्या वृत्तांना फेटाळून लावले आणि तेहरानला तिथे विमाने हलवण्याची गरज नसल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

जोसेफ विजय यांचा दारू दुकानांवर प्रहार

रशिया- युक्रेन यांच्यात १,००० कैद्यांची होणार अदलाबदल

सोमनाथ मंदिरात वैदिक मंत्र, भजन आणि पहिल्यांदाच झाला कुंभाभिषेक

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती; सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरला

दरम्यान, युद्धविरामाची घोषणा होऊनही इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कायम आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, संघर्ष संपवण्याच्या प्रस्तावाचा भाग म्हणून इराणने अमेरिकेकडून युद्ध नुकसान भरपाई, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपल्या सार्वभौमत्वाची मान्यता आणि अमेरिकन निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी तेहरानचा प्रतिप्रस्ताव “पूर्णपणे अस्वीकार्य” असल्याचे म्हणत जाहीरपणे फेटाळला , मात्र कोणत्या मागण्या फेटाळल्या हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

Exit mobile version