सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक

१,६४४ जणांना संसर्ग, ९४ जण रुग्णालयात

सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक

अमेरिकेत अन्नातून पसरणाऱ्या सायक्लोस्पोरायसिस (Cyclosporiasis) या परजीवी संसर्गाचा मोठा उद्रेक झाला असून, दूषित आइसबर्ग लेट्यूस (एक प्रकारची सॅलडची भाजी; जी दिसायला कोबीसारखी असते) खाल्ल्यामुळे आतापर्यंत १,६४४ जण बाधित झाले आहेत. यापैकी ९४ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या संसर्गामुळे तीव्र आणि वारंवार होणाऱ्या अतिसारामुळे (Diarrhea) आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

अमेरिकेची अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (CDC) या उद्रेकाची संयुक्त चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात अमेरिकेतील पाच राज्यांतील टॅको बेल (Taco Bell) रेस्टॉरंटमध्ये वापरल्या गेलेल्या कापलेल्या आइसबर्ग लेट्यूसचा या संसर्गाशी संबंध आढळून आला आहे. हे लेट्यूस मेक्सिकोतील एका पुरवठादाराकडून आणण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर टेलर फार्म्स दे मेक्सिको या कंपनीने मध्य मेक्सिकोमधून आयात करण्यात आलेले सर्व आइसबर्ग लेट्यूस स्वेच्छेने बाजारातून मागे घेतले आहे. तसेच वॉलमार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या काही मार्केटसाईड ब्रँडच्या सॅलड उत्पादनांचाही रिकॉल करण्यात आला आहे. ग्राहकांना ही उत्पादने वापरू नयेत आणि त्वरित फेकून द्यावीत, असे आवाहन अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनने केले आहे.

मात्र, या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोडही समोर आली आहे. सुरुवातीला लेट्यूसच्या नमुन्यात Cyclospora परजीवी आढळल्याचा दावा अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनने केला होता. मात्र, प्रयोगशाळेने पुन्हा तपासणी केल्यानंतर तो अहवाल ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अद्याप कोणत्याही लेट्यूसच्या नमुन्यात परजीवीची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही चौकशी सुरू असून, संशयित उत्पादने बाजारातून हटविण्याची कारवाई कायम ठेवण्यात आली आहे.

सायक्लोस्पोरायसिस हा Cyclospora cayetanensis या सूक्ष्म परजीवीमुळे होणारा संसर्ग आहे. दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे तो पसरतो. संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात लक्षणे दिसू लागतात. वारंवार होणारा पातळ अतिसार, पोटदुखी, मळमळ, भूक न लागणे, वजन घटणे, थकवा आणि पोट फुगणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर उपचार न केल्यास हा त्रास अनेक आठवडे टिकू शकतो.

हे ही वाचा:

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर अर्जेंटिनात हिंसाचार; चाहत्यांचा संताप अनावर

“मी ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही” मोदींचा राहुल गांधींना टोला

दिल्लीत जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीमार

रुग्णालयातील निष्काळजीपणाचा बळी? छताचा पंखा कोसळून रुग्णाचा मृत्यू

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन आणि रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र यांनी ग्राहकांना रिकॉल करण्यात आलेले लेट्यूस किंवा त्यापासून तयार केलेली उत्पादने अजिबात खाऊ नयेत, तसेच संबंधित अन्नसामग्रीच्या संपर्कात आलेली भांडी आणि पृष्ठभाग नीट स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे. दूषित लेट्यूस खाल्ल्यानंतर अतिसार किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version