नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी निदर्शने केली. या निदर्शनांना हिंसक वळण मिळून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र होते. या दरम्यान पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. याचं पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. तर, नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदीही मागे घेण्यात आली आहे. अशातच आता नेपाळच्या कृषी मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी काठमांडू आणि नेपाळच्या इतर भागांमध्ये ‘Gen Z’ निदर्शनांदरम्यान सरकारच्या कारवाईचा निषेध केला होता. यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी झालेल्या निदर्शनांच्या हाताळणीची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कृषी मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे.
रामनाथ अधिकारी यांनी म्हटले आहे की, “लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आणि शांततापूर्ण निषेध करण्याचा नागरिकांचा अधिकार ओळखण्याऐवजी, सरकारने दडपशाही आणि बळाचा वापर करून देशाला लोकशाहीऐवजी हुकूमशाहीकडे नेले. ज्या पिढीसोबत राष्ट्र उभारणीसाठी सहकार्य करायला हवे त्या पिढीविरुद्ध सरकारने हिंसक वर्तन कसे केले या प्रश्नांची उत्तरे न देता ते सत्तेत राहू शकत नाहीत.” दरम्यान, नेपाळ काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा यांनीही पंतप्रधान ओली यांना निदर्शनांदरम्यान झालेल्या निदर्शकांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी घेण्याचे आणि त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
“नेपाळमध्ये असंतोष कायम; सोशल मीडिया सुरु होताच पुन्हा जनआंदोलन पेटलं”
“सावधगिरी बाळगा! नेपाळमधील हिंसक निदर्शनांमुळे भारत सरकारची नागरिकांना सूचना”
६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्रा यांना समन्स
सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा; नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या दरम्यान पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. शिवाय राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य तैनात करावे लागले. निदर्शनाला हिंसक वळण मिळताच नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली.







