परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी लोकसभेत माहिती दिली की, पाकिस्तानशी असलेल्या संघर्षादरम्यान भारत आणि अमेरिकेतील चर्चेदरम्यान कधीही व्यापाराशी कोणताही संबंध नव्हता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध रोखण्यासाठी व्यापाराचा वापर केल्याचे दावे फेटाळून लावले. लोकसभेत बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल (पहलगाम दहशतवादी हल्ला) आणि १७ जून (भारत-पाकिस्तान युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ) दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नाही.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेवर प्रकाश टाकताना जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता, ज्याला मोदींनी उत्तर दिले की भारत आणखी जोरदार प्रत्युत्तर देईल. जयशंकर यांनी त्यानंतर सांगितले की, ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले.
ते पुढे म्हणाले, अनेक देशांनी १० मे रोजी भारताशी संपर्क साधला आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार असल्याचे कळवले. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताने सर्व देशांना स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानकडून युद्धबंदीच्या चर्चा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) चॅनेलद्वारे झाल्या तरच त्या चर्चेचा विचार केला जाईल.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापार हा विषय नव्हता या जयशंकर यांच्या विधानाचा विरोधकांनी निषेध करण्यास सुरुवात करताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केला आणि म्हटले की, विरोधी पक्षांना त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांवर विश्वास नाही, “पण दुसऱ्या देशावर विश्वास आहे.
”मी त्यांच्या पक्षात परराष्ट्र खात्याचे महत्त्व समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाच्या सर्व गोष्टी येथे सभागृहात लादल्या पाहिजेत. हेच कारण आहे की ते तिथे (विरोधी पक्षाच्या बाकांवर) बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसतील,” असे अमित शहा म्हणाले.







