अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याचा आपला दावा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. तसेच यावेळी त्यांनी युद्धादरम्यान पाडण्यात आलेल्या लढाऊ विमानांची संख्या सातवरून आठ केली. दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी मे महिन्यात शांतता प्रस्थापित केली असे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांचे व्यापार करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतरच युद्ध थांबल्याचा दावा केला. मियामी येथील अमेरिका बिझनेस फोरममध्ये त्यांनी हा दावा पुन्हा एकदा मांडला.
“मी भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार कराराच्या मध्यभागी होतो, आणि मग मी एका विशिष्ट वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर वाचले, मी ऐकले की ते युद्ध करणार आहेत. सात विमाने पाडण्यात आली आणि आठवे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. आठ विमाने पाडण्यात आली. मी म्हणालो, तुम्ही शांततेसाठी सहमत असल्याशिवाय मी तुमच्याशी कोणताही व्यापार करार करणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रांनी म्हटले व्यापाराचा आणि संघर्षाचा काहीही संबंध नाही, पण मी म्हटले की त्याचा सर्वस्वी संबंध आहे. तुम्ही अणुशक्ती असणारे देश आहात. मी तुमच्याशी व्यापार करत नाही. जर तुम्ही एकमेकांशी युद्ध करत असाल तर आम्ही तुमच्याशी कोणताही करार करणार नाही.” यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना फोन आला की दोन्ही देशांनी युद्ध थांबवले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
भारताने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा फेटाळून लावला आणि पाकिस्तानी कमांडर्सनी त्यांच्या भारतीय समकक्षांना आक्रमण थांबवण्याची विनंती केल्यानंतर १० मे रोजी युद्धबंदी झाली असे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान सात विमाने पाडण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी या विमानांचे वर्णन “अगदी नवीन” आणि “सुंदर” असे केले होते.
हेही वाचा..
UNSC मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहणार!
“प्रथम मतदान, नंतर अल्पोपहार!” पंतप्रधान मोदींकडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
वाटाघाटी न झाल्यास तालिबानशी युद्धचं! काय म्हणाले पाक संरक्षण मंत्री?
वाळवंटात ‘अखंड प्रहार’ मोहिमेचं प्रदर्शन
भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी सांगितले होते की, चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ११ ते १२ विमाने निष्क्रिय केली आहेत, ज्यात F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. तसेच त्यांनी भारताची सहा विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा काल्पनिक कथा असल्याचे सांगत फेटाळून लावला होता.







