कॅनडातील खलिस्तानी समर्थक शीख नेते आणि न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (NDP) प्रमुख जगमीत सिंग यांनी सार्वत्रिक निवडणुकीत जबरदस्त पराभव झाल्यानंतर पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
या निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बर्नाबी सेंट्रल मतदारसंघातील जागा गमवावी लागली असून, पक्ष फक्त सात जागांवर आल्याने त्याचा अधिकृत पक्षाचा दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण
सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य
पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कबुलीचे आश्चर्य कसले?
सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कारखान्यात ‘ड्रग्स’ची निर्मिती
सिंग यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी निराश आहे की आम्ही अधिक जागा जिंकू शकलो नाही. पण आमच्या चळवळीवर मला गर्व आहे. मला पक्षाबाबत आशा आहे. आपण नेहमी भीतीऐवजी आशा निवडतो.”
ते पुढे म्हणाले, “आपण पराभूत होतो तेव्हा, जेव्हा आपण हे मान्य करतो की आपण कधीच चांगल्या कॅनडाचं स्वप्न पाहू शकत नाही. माझ्या आईने दिलेला एक धडा कायम लक्षात राहतो – ‘चढ्दी कला’ म्हणजे संघर्षातूनही सकारात्मकता राखणे. हीच भावना आज मी मनात बाळगतो.”
जगमीत सिंग हे खलिस्तानी चळवळीचे खुले समर्थक मानले जातात. त्यांनी अनेक वेळा भारतात स्वतंत्र शीख राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्थन दर्शवले आहे. भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण असताना, विशेषतः खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर, सिंग हे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
ट्रुडोंच्या लिबरल पक्षाला सत्तेवर टिकवण्यासाठी सिंग यांच्या NDP पक्षाने चार वर्षे साथ दिली होती. मात्र, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी ट्रुडोंवर “कॉर्पोरेट लोभासमोर झुकल्याचा” आरोप करत युती तोडली होती.
सिंग हे कॅनडातील कोणत्याही मोठ्या फेडरल पक्षाचे नेतृत्व करणारे पहिले अल्पसंख्याक नेते होते. ही त्यांची तिसरी फेडरल निवडणूक मोहीम होती.







