33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरदेश दुनियापाकिस्तानच्या गंगाजळीत ८ अब्ज डॉलर बांगलादेश मागतोय त्यातले ४ अब्ज!

पाकिस्तानच्या गंगाजळीत ८ अब्ज डॉलर बांगलादेश मागतोय त्यातले ४ अब्ज!

जाहीर माफी मागण्याचीही केली मागणी

Google News Follow

Related

बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा तब्बल १५ वर्षांनंतर पार पडली. भारताचे या दोन्ही देशांशी संबंध ताणलेले असल्यामुळे या चर्चांमधून भारताला नवी डोकेदुखी सतावणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, पाकिस्तान बांगलादेश भेटीत वेगळेचं चित्र पाहायला मिळाले आणि पाकिस्तानची नाचक्की झाल्याची समोर आले आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील झालेल्या या पहिल्या चर्चेत बांगलादेशने ऐतिहासिकदृष्ट्या निराकरण न झालेले मुद्दे उपस्थित केले. यामुळे पाकिस्तानला चांगलाचं दणका मिळाला असून बांगलादेशने १९७१ च्या अत्याचारांबद्दल पाकिस्तानकडून जाहीर माफी मागण्याचीही मागणी केली आहे. याशिवाय ४.३ अब्ज डॉलर्स थकबाकीच्या रकमेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दीन यांनी परराष्ट्र मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पाकिस्तानसोबतच्या आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे मुद्दे सोडवले पाहिजेत. आम्ही १९७१ च्या अत्याचारांसाठी सार्वजनिक माफी मागण्याची मागणी पाकिस्तानसमोर करत ४.३ अब्ज डॉलर्सचा आमचा आर्थिक दावाही ठेवला आहे. यामध्ये १९७१ च्या युद्धादरम्यान बांगलादेश सोडू न शकलेल्या अडकलेल्या पाकिस्तानींना परत आणणे आणि १९७० च्या चक्रीवादळासाठी परदेशी मदत म्हणून मिळालेल्या पैशाचा समावेश होता.” बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशीम उद्दीन आणि पाकिस्तानी समकक्ष आमना बलोच यांच्यात २७ आणि २८ एप्रिल रोजी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या ढाका भेटीच्या काही दिवस आधी परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत (एफओसी) होत आहे. चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता, बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितले की त्यांनी या मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवण्याची तयारी दर्शविली आहे.

४.३ अब्ज डॉलर्स थकबाकीच्या मागील इतिहास काय?

पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या चर्चांमध्ये १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्येही थकबाकी देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळीही ढाकाने म्हटले होते की, यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश हे स्वतंत्र देश नव्हते म्हणजेच पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे एकत्र होते तेव्हाच्या देशाच्या मालमत्तेचे वेगळे झाल्यावर समान दोन भाग व्हायला हवे होते पण तसे झाले नव्हते. १९७१ च्या अत्याचारांसाठी आम्हाला औपचारिक माफीनामाही पाकिस्तानने द्यावा, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.

१९७० साली ‘भोला’ चक्रीवादळ पूर्व पाकिस्तानला (आताचा बांगलादेश) धडकले होते. हे चक्रीवादळ भयंकर होते आणि यात सुमारे तीन ते पाच लाख लोकांचा मृत्यू झाला होता. करोडोंच्या संख्येने लोकांना स्थलांतर करावे लागले होते. नैसर्गिक आपत्तीनंतर जगभरातून पूर्व पाकिस्तानसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. यात भारताचेही योगदान होते. जगभरातील देशांनी केलेली ही एकूण मदत होती २०० अब्ज डॉलर्सची. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या ढाका शाखेत ही रक्कम जमा झाली होती. पुढे १९७१ साली बांगलादेश मुक्ती संग्राम सुरू झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. या दरम्यानच्या काळात मदत म्हणून आलेला पैसा ढाका शाखेतून पाकिस्तानमधील लाहोर शाखेत वळवला गेला. त्यामुळे बांगलादेशमधील पीडितांना हा पैसा कधी पोहचलाच नाही. आता बांगलादेशचे पाकिस्तानला म्हणणे आहे की, हा पैसा तेव्हा आमच्या मदतीसाठी जगभरातून पाठवण्यात आला होता तो आम्हाला परत करा.

यानंतर बांगलादेशने देशाच्या मालमत्तेच्या विभागणीचाही मुद्दा उपस्थित केला आहे. बांगलादेशचे म्हणणे आहे की, दोन देश वेगळे झाल्यावर बांगलादेशची लोकसंख्या होती ५६ टक्के आणि परकीय गुंतवणुकीतील कमाई होती ५४ टक्के त्यामुळे कमीत कमी ५० टक्के देशाच्या मालमत्तेवर आमचा अधिकार आहे. शिवाय त्यावेळी जे चलन वापरात होते ते सुमारे ८७० करोड इतके होते. त्यामुळे त्याचा अर्धा हिस्सा सुमारे ४३५ करोड पाकिस्तानने बांगलादेशला द्यायला हवेत. असेच बँकेतील ६० करोड जमा रक्कम, परदेशात असलेली जमा रक्कम, शिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये स्वातंत्र्यापूर्वी बांगलादेशी लोकांनी भरलेले पैसे जे सरकारने कधी दिलेच नाहीत असे सर्व पैसे एकत्र केल्यास पाकिस्तानला थकबाकी देणं भाग आहे. शिवाय स्वातंत्र्यानंतर काही कर्ज बांगलादेशने परतफेड करून त्यांची जबाबदारी पार पाडली आणि हेच सगळे पैसे मिळून होतात ४.३ अब्ज डॉलर्स. ते बांगलादेश आज पाकिस्तानकडून मागत आहे.

बांगलादेशच्या मागणीवर पाकिस्तानचे म्हणणे काय?

पाकिस्तान जेव्हा १९४७ साली निर्माण झाला तेव्हा पाकिस्तानने भारताकडून ७५ करोड रुपये घेतले होते. म्हणजेच पाकिस्तानने स्वतः निर्माण होताना पैसे घेतले पण जेव्हा बांगलादेश निर्माण झाला तेव्हा मात्र त्यांना पैसे दिले नाहीत. बांगलादेशच्या मागणीवर पाकिस्तानचे म्हणाले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शिमला करार १९७२ मध्ये सर्वकाही संपले आहे. बांगलादेशला देश म्हणून मान्यता दिली आणि बाकी काहीही लिखित नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्यामुळे बांगलादेश दावा करत असलेले सर्व पैसे पाकिस्तानचे होते.

हे ही वाचा:

हमासने गुडघे टेकले; युद्ध समाप्तीच्या बदल्यात उर्वरित सर्व बंधकांना मुक्त करण्याची तयारी

फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार; दोघांचा मृत्यू

‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’

शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने माथाडी कामगाराने स्वतःवर गोळी झाडली

एकूणच बांगलादेशने जुने मुद्दे उकरून काढून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी पाकिस्तान बांगलादेशची मागणी किती पूर्ण करेल याबाबत शंका कायम आहे. जो देश स्वतःची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इतर देशांचे उंबरे झिजवत आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) समोर हात पसरून उभा आहे तो बांगलादेशला ४.३ अब्ज डॉलर्स देणार कुठून असा प्रश्न आहे. दुसरीकडे बांगलादेशचीही वेगळी परिस्थिती नसून ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूचं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा