अंतराळात १८ दिवस व्यतित केल्यानंतर भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे पृथ्वीवर परतले आहेत. कॅलिफोर्निया येथील प्रशांत महासागरात त्यांच्या ड्रॅगन कुपीचे (कॅप्सूल) लँडिग झाले आणि त्यातून सुखरूप शुभांशू बाहेर येतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले. भारतीयांसह सगळ्या जगाने हे दृश्य डोळे भरून पाहिले. शुभांशू यांचे आईवडील, पत्नीच्या डोळ्यात हे दृश्य पाहिल्यावर आनंदाश्रु तरळले.
शुभांशू या कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी हात हलवून सर्वांना अभिवादन केले. आता त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. तिथे त्यांना विश्रांती घेता येईल तसेच वेगवेगळ्या तपासण्याही होतील.
ही कुपी किनाऱ्यावर आल्यानंतर त्यातून सर्वप्रथम अमेरिकेची अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन बाहेर आली. त्यानंतर शुभांशू बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर ही मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद आणि समाधान दिसत होते. शुभांशू हे पहिले भारतीय आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट दिली आणि ते सुखरूप परत आले.
हे ही वाचा:
पुणे पोर्श अपघात: अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार नाही!
१३ बांगलादेशी नागरिकांना पकडले
निवडणुकीवेळीच काँग्रेसला आठवतात मागासवर्गीय
“जडेजा लढला, भारत हरला; गिलने दिली शाबासकी”
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभांशूचे अभिनंदन केले आहे. मी देशासोबत शुभांशू यांच्या परतीचे स्वागत करतो. अवकाश स्थानकापर्यंत पोहोचणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. त्यातून त्यांचा त्याग, समर्पण, साहस यांचे दर्शन घडते. त्यामुळे अवकाशात जाऊ इच्छिणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत. आमच्या गगनयान मोहिमेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाईल.
दरम्यान, लखनऊमध्ये केक कापून शुभांशूच्या नातेवाईकांनी आनंद साजरा केला.
हे सगळे चार अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर एक्सिओम ४ ही मोहीम सुफळ संपूर्ण झाली आहे. २५ जूनला फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधून हे सगळे अंतराळवीर अवकाशात झेपावले होते. तिथे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात ते राहिले. तिथे काही संशोधन केले आणि आता ते परतले आहेत.
शुभांशू यांचे वडील म्हणाले की, ही हनुमानजींची कृपा आहे की, शुभांशू सुखरूप परतला आहे. आम्हाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही संपर्क साधला. त्यांनी आनंद व्यक्त केला आणि देशाला शुभांशूबद्दल अभिमान वाटतो. वडील शंभू दयाल म्हणाले की, आमचा मुलगा सुखरूप पृथ्वीवर परत यावा अशी आमची इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. राजनाथ सिंह यांनी शुभांशूला आशीर्वाद दिले आहेत.
भारतीय हवाई दलानेही शुभांशू यांचे कौतुक करत त्यांचे स्वागत केले आहे. सगळे एअर वॉरियर्स हे या मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन करत आहेत.







