अफगानिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर ९ ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर काबूलहून नवी दिल्लीला हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा असेल. त्यामुळे हा दौरा भारत- तालिबान संबंधात एक नवीन अध्याय सुरू करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पुष्टी केली आहे की, मुत्ताकी यांना आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंधांमधून तात्पुरती सूट देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांना ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तालिबान प्रशासन आणि अफगानिस्तान संबंध पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भेटीला महत्त्व आहे.
भारतीय राजनैतिक वर्तुळ याची तयारी अनेक महिन्यांपासून करत आहेत. जानेवारीपासून, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि वरिष्ठ आयएफएस अधिकारी जेपी सिंग यांच्यासह भारतीय अधिकाऱ्यांनी मुत्ताकी आणि इतर तालिबानी नेत्यांशी संवादाच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. तसेच दुबईसारख्या तटस्थ ठिकाणी भेटीही झाल्या आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दुबईमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली, जिथे नवी दिल्लीकडून अफगाणिस्तानला सुरू असलेल्या मानवतावादी मदतीवर, विशेषतः आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासाठी आणि निर्वासितांच्या पुनर्वसनाला पाठिंबा देण्यासाठी चर्चा झाली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची ‘ही’ गोष्ट युरोपियन नेत्यांनी शिकावी! काय म्हणाले सेमीकंडक्टर कंपनीचे अधिकारी?
भारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्कावरून रशियाने अमेरिकेला सुनावले! काय म्हणाले पुतीन?
भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’
गाझामध्ये जे थांबतील त्यांना दहशतवादी मानले जाईल!
१५ मे रोजी भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरनंतर लगेचच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली. २०२१ नंतरचा हा पहिला मंत्रीस्तरीय संपर्क होता. त्या चर्चेदरम्यान, जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तालिबानच्या निषेधाबद्दल कौतुक व्यक्त केले आणि भारताची अफगाणिस्तानातील लोकांशी पारंपारिक मैत्री पुन्हा अधोरेखित केली. एप्रिलच्या सुरुवातीला, तालिबानने काबूलमध्ये भारतीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारताच्या काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता.
भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीचा विस्तार केला आहे. अन्नधान्य, वैद्यकीय पुरवठा आणि विकास मदत पुरवली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या भूकंपानंतर, भारताने सर्वात जास्त नुकसान झालेल्या प्रांतांमध्ये १,००० कुटुंबांसाठी तंबू आणि १५ टन अन्न पुरवठा जलद गतीने पाठवला. त्यानंतर लवकरच आवश्यक औषधे, स्वच्छता किट, ब्लँकेट आणि जनरेटरसह अतिरिक्त २१ टन मदत साहित्य पाठवण्यात आले, जे संकटाच्या काळात अफगाणिस्तानातील लोकांना मदत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.







