बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून, तेथील नेते हे वारंवार भारताविरुद्ध वक्तव्ये करत आहेत. नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी) साउथचे मुख्य संयोजक हसनत अब्दुल्ला यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, जर बांगलादेशला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला तर भारताचा संपूर्ण ईशान्य भाग हा वेगळा होईल.
इन्कलाब मंचने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये हसनत यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या आणि उस्मान हादीवर हल्ला करणाऱ्यांना भारताचा पाठिंबा मिळतो. त्यांनी असेही म्हटले की, सीमेवर बांगलादेशींच्या हत्यांमध्ये भारताचा सहभाग आहे. हसनत यांनी या रॅलीत भारतावर अनेक निराधार आरोप केले.
हसनत म्हणाले की, जर बांगलादेश अस्थिर झाला तर आग सीमेपलीकडे पसरेल. स्वातंत्र्याच्या ५४ वर्षांनंतरही बांगलादेश गिधाडांच्या नजरेखाली आहे आणि बाहेरून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की, शेख हसीना आणि त्यांचे समर्थक पैशाच्या मोबदल्यात लोकांना फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. जे लोक सत्तेसाठी भारताकडे पाहतात ते बांगलादेशचे स्वातंत्र्य विकण्याचा कट रचत आहेत. पुढे ते म्हणाले की, “मी भारताला स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर तुम्ही बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा, क्षमतांचा, मतदानाचा हक्कांचा आणि मानवी हक्कांचा आदर न करणाऱ्या शक्तींना आश्रय दिला तर बांगलादेश प्रत्युत्तर देईल.” बांगलादेशला अस्थिर करण्याचे गंभीर परिणाम होतील आणि संपूर्ण प्रदेशात अशांतता पसरेल.
हे ही वाचा:
“संजौली मशिदीचे अनधिकृत मजले हवेतर आम्ही मोफत पाडू!”
विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १९७१ च्या युद्धवीरांना श्रद्धांजली!
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर काय ?
ईशान्येकडील सात राज्ये ही सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखली जातात. त्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडी कॉरिडॉरमधील ‘चिकन नेक’ नावाच्या एका छोट्या भागाद्वारे मुख्य भूमीशी जोडलेले असल्याने हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील आहे.







