इराणसोबतचा तणाव आणि संघर्षविराम सुरू असतानाच अमेरिकेने सोमवारी (२५ मे) दक्षिण इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) च्या मते, ही कारवाई “आत्मसंरक्षण” म्हणून करण्यात आली असून, या प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांचे आणि लष्करी साधनसामग्रीचे संरक्षण करणे हा तिचा उद्देश होता.
CENTCOM चे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इराणी दलांकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून आमच्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सैन्याने आज दक्षिण इराणमध्ये आत्मसंरक्षणात्मक कारवाई केली.” त्यांनी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीत सागरी माईन्स (सुरुंग) पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी नौकांचा समावेश होता. हॉकिन्स म्हणाले, संघर्षविराम सुरू असतानाही अमेरिकन सेंट्रल कमांड संयम बाळगत आपल्या दलांचे संरक्षण करण्याचे काम सुरू ठेवत आहे.
एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) च्या दोन नौका होर्मुझ सामुद्रधुनीत सागरी माईन्स पेरताना दिसून आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकन सैन्याने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. तसेच बंदर अब्बास येथे तैनात असलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीवरही हल्ला करण्यात आला. या प्रणालीने अमेरिकन लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. अधिकाऱ्याने दावा केला की, या संरक्षणात्मक हल्ल्यांमध्ये दोन्ही इराणी नौका आणि क्षेपणास्त्र तळ नष्ट करण्यात आले.
हे ही वाचा:
सीएनजी दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ
बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात छापेमारी
एआयएडीएमकेच्या तीन आमदारांचा राजीनामा; टीव्हीके पक्षात केला प्रवेश
जागतिक स्तरावर तेलाच्या किमती घसरल्या तरी भारतात इंधन दरवाढ का?
दरम्यान, सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अनेक स्फोट झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. इराणी माध्यमांनी बंदर अब्बास येथे स्फोट झाल्याची पुष्टी केली, तर सिरिक आणि जास्क या किनारी भागांजवळही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले गेले. नंतर एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सध्या ही लष्करी कारवाई संपल्याचे स्पष्ट केले. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करण्याची मागणी पुन्हा एकदा केली.
