केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी केलेल्या छापेमारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीएमआरएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडीने तिरुवनंतपुरम आणि कन्नूरमधील विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. यामध्ये पिनराई विजयन यांचे निवासस्थान तसेच त्यांच्या कन्या टी. वीणा विजयन यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश होता. या कारवाईची माहिती समोर येताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि ईडीच्या कारवाईविरोधात जोरदार निदर्शने सुरू झाली.
हे ही वाचा:
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!
बकरी ईदनिमित्त सोसायट्यांत बकऱ्या, घाटकोपरमध्ये सोमय्यांनी दिली भेट
मिरा रोडनंतर आता दिंडोशीतील सोसायटीत उभारली बकऱ्यांची शेड
तेल बाजार अस्थिर; कच्चे तेल ९५ डॉलरच्या जवळ
ईडीच्या तपासानुसार, कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (सीएमआरएल) या कंपनीकडून वीणा विजयन यांच्या एक्सालॉजिक सोल्यूशन्स या आयटी कंपनीला सुमारे ₹१.७२ कोटींचे पेमेंट करण्यात आले होते. मात्र या बदल्यात कोणतीही सेवा पुरवण्यात आल्याचा ठोस पुरावा नसल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. याच आर्थिक व्यवहारांमधून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात येत असून ईडीने या संदर्भातील कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि बँक व्यवहारांची माहिती तपासण्यासाठी छापेमारी केली.
दरम्यान, ईडीचे अधिकारी पिनराई विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर तपास करत असताना संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती काही वेळातच तणावपूर्ण बनली आणि काही निदर्शकांनी ईडीच्या वाहनांवर दगडफेक व तोडफोड केल्याचे समोर आले. काही अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की झाल्याच्याही घटना घडल्या. या गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून केरळमच्या राजकारणात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये ईडीच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. गाडीवर मोठ्याप्रमाणावर दगड आणि काठीच्या सहाय्याने हा हल्ला करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारच्या काळात देखील अनेक ठिकाणी असे ई़डीवर हल्ले झाले होते.
केरळम उच्च न्यायालयाने अलीकडेच ईडीला या प्रकरणातील तपास पुढे सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या तपासाला अधिक वेग मिळाला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून डाव्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मात्र ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
या घटनेनंतर केरळममध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ईडीच्या तपासातून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यातील राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.







