बांगलादेशातील वाढती हिंसा आणि अराजकता यावर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील सतत बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबाबत एका अमेरिकी खासदाराने तीव्र चिंता व्यक्त केली असून, वेळीच सुधारात्मक पावले उचलली नाहीत तर वाढती हिंसा आणि अल्पसंख्यांकांवरील हल्ले देशाला अधिक अस्थिर करू शकतात, असा इशाराही दिला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी आयएएनएसशी खास बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले, “बांगलादेशातील सुरक्षेची परिस्थिती पाहून मी खूपच अस्वस्थ आहे. मला वाटते की ती आणखी बिघडली आहे.”
ते म्हणाले की बांगलादेशातील मानवी हक्कांची स्थिती ढासळत चालली असून हिंसा आता कळसाला पोहोचली आहे. “दुर्दैवाने, सरकार बदलल्यानंतरही परिस्थिती चांगली नव्हती आणि आता ती आणखीच वाईट झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या अभावामुळे हिंसक गटांना मोकळे रान मिळाले आहे, असे कृष्णमूर्ती म्हणाले. विशेषतः धार्मिक अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल ते चिंतित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा..
अवकाशात भारताच्या या ८ कामगिरींनी फडकवला यशाचा झेंडा
वायुगुणवत्तेत सुधारणा : दिल्लीत ६ ते ९ वी आणि ११ चे वर्ग पुन्हा सुरू
थायलंड- कंबोडिया सीमेवर विष्णू मूर्तीची विटंबना; भारताने काय म्हटले?
मशिदीत झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू
“ज्या गटाबद्दल मी विशेषतः चिंतित आहे तो म्हणजे बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक,” असे ते म्हणाले. अलीकडे झालेल्या भयानक हत्यांच्या घटनांमुळे ते अधिकच व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार बदलून एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही परिस्थिती भयावहच होत चालली आहे. “दुर्दैवाने, अनेक लोकांवर सर्वसाधारण हिंसा होत आहे,” असेही त्यांनी नमूद केले. अलीकडे बांगलादेशात एका हिंदू युवकाला कट्टरपंथी जमावाने निर्दयपणे मारहाण करून ठार केले आणि त्याच्या मृतदेहाला आग लावली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “जेव्हा सुरक्षेची परिस्थिती इतकी वाईट असते, तेव्हा आपण अशा घटना पाहतो जिथे एखाद्या व्यक्तीला फक्त त्याच्या धर्मामुळे, म्हणजे तो हिंदू आहे म्हणून, ठार मारले जाते.”
या घटनेनंतर झालेल्या अटकांबाबत ते म्हणाले, “या निर्दयी हत्येनंतर सुमारे डझनभर लोकांना अटक करण्यात आली, हे चांगले आहे. पण अधिक कारवाई करणे आणि ती लवकर करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर दोषींना शिक्षा होणार नाही आणि हत्या सुरूच राहतील.” बांगलादेशातील परिस्थिती स्थिर करण्यामध्ये अमेरिकेच्या भूमिकेबाबत कृष्णमूर्ती म्हणाले, “अमेरिकेने बांगलादेशासह इतर देशांनाही सतत आठवण करून द्यायला हवी की आम्हाला तुमचे यश हवे आहे आणि आम्ही मदत करायला तयार आहोत. पण त्यासाठी अल्पसंख्यांक सुरक्षित राहतील, सुरक्षा परिस्थिती सुधारेल आणि प्रत्येकजण सुरक्षिततेच्या वातावरणात काम करू शकेल, हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले की सार्वजनिक सुरक्षा प्रस्थापित करण्यात अपयश आल्यास कट्टरपंथी शक्तींना संधी मिळू शकते. “लोकांना जर सार्वजनिक सुरक्षेची भावना नसेल, तर सर्वांसाठी काम करणारी अर्थव्यवस्था उभी राहू शकत नाही. अल्पसंख्यांकांची सुरक्षा ही चांगल्या शासनाची मूलभूत अट आहे,” असा इशारा त्यांनी दिला.







