पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त विधान केले असून त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान युद्धासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना असा दावा केला आहे की, त्यांचा देश पूर्व सीमेवर भारताविरुद्ध आणि पश्चिम सीमेवर तालिबानविरुद्ध दोन आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना आसिफ म्हणाले, “आम्ही दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार आहोत. आम्ही पूर्व (भारत) आणि पश्चिम सीमेवर (अफगाणिस्तान) दोन्ही बाजूंना तोंड देण्यासाठी तयार आहोत. अल्लाहने पहिल्या फेरीत आम्हाला मदत केली आणि दुसऱ्या फेरीत तो आम्हाला मदत करेल.” मंगळवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटात १२ जणांचा मृत्यू आणि ३६ जण जखमी झाल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले. पाकिस्तानी तालिबान (टीटीपी) ने या आत्मघाती बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी “भारीय पाठींब्याने” हा हल्ला केल्याचा आरोप केला, तर ख्वाजा आसिफ म्हणाले की अफगाण तालिबानने बॉम्बस्फोटाद्वारे संदेश दिला आहे. “काबूलचे राज्यकर्ते पाकिस्तानमधील दहशतवाद थांबवू शकतात, परंतु हे युद्ध इस्लामाबादपर्यंत पोहोचवणे हा काबूलचा संदेश आहे. पाकिस्तानकडे याला प्रत्युत्तर देण्याची पूर्ण ताकद आहे,” असे आसिफ यांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
दिल्ली बॉम्बस्फोट: आरोपी डॉ. उमर, डॉ. मुझम्मिलच्या डायरी जप्त; काय सापडले डायरीत?
इस्लामाबाद स्फोटानंतर श्रीलंकन खेळाडूंना पाकिस्तानातचं राहण्याचे आदेश
दिल्लीतील कार बॉम्बर तुर्कीमधील हँडलर “उकासा”च्या संपर्कात
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा ४३ दिवसांचा शटडाऊन संपला!
दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आसिफ यांनी अलिकडेच हे वक्तव्य केले. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला कमी लेखत त्यांनी तो केवळ सिलेंडर स्फोट असल्याचे वर्णन केले आणि भारतावर घटनेचे राजकारण करण्याचा आरोप केला. “कालपर्यंत हा गॅस सिलेंडरचा स्फोट होता. आता ते याला परदेशी कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत लवकरच यासाठी पाकिस्तानला दोष देऊ शकतो,” असे आसिफ म्हणाले. भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे विधान लक्ष विचलित करण्याचा एक हताश प्रयत्न म्हणून फेटाळून लावले आहे.







