प्रभू श्रीरामचंद्र हे अखिल मानवजातीसाठी एक आदर्श पुरुष आहेत असे प्रतिपादन साध्वी रितांबरा यांनी केले आहे. त्या मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला १५ जानेवारीपासून सुरुवात झाली. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतातर्फे मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत देशात भव्य राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन होणार आहे. ‘राम मंदिर निर्माण से राष्ट्र निर्माण’ या कार्यक्रमांतर्गत साडेचार लाख गावातील ११ कोटी परिवारांपर्यंत जाऊन निधी संकलन केले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील ५० ते ६० कोटी रामभक्तांशी संपर्क साधला जाणार आहे.
अयोध्येत निर्माण होणारे भव्य राम मंदिर हे कोणा एका परिवार अथवा संघटनेचे नसून अखंड हिंदुस्तानचे श्रद्धा, शक्ती केंद्र आहे त्यामुळे राम मंदिर उभारणीसाठी सर्व रामभक्तांनी यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन साध्वी रितांबरा यांनी केले. या निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून तरुण पिढीला रामजन्मभूमीच्या संघर्षाशी परिचित करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. “एका मोठ्या श्रेठीच्या माध्यमातून भव्य राम मंदिर निर्माण होऊ शकले असते. पण तसे होणार नाहीये कारण प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर निर्माणात सर्व रामभक्तांचा सहभाग असला पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांना अभिमान वाटला पाहिजे की या इतिहासात माझ्या पूर्वजांचेही योगदान आहे” अशी भूमिका साध्वीजींनी मांडली.