ओडिशाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते मोहम्मद मोकीम यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र नेत्या सोनिया गांधी यांना लिहिले होते. यानंतर मोहम्मद मोकीम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसने मोकीम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात मोकीम यांनी काँग्रेस नेतृत्वावर आणि अंतर्गत काही बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटीने एक आदेश जारी केला असून त्यात म्हटले आहे की, पक्षविरोधी कारवायांमुळे मोहम्मद मेकीम यांना प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मोकीम म्हणालेकी, “मी सोनिया गांधींना एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये म्हटले होते की पक्ष कठीण काळातून जात आहे. पक्षाला नवीन नेतृत्वाची आवश्यकता आहे. मल्लिकार्जुन खरगे खूप ज्येष्ठ नेते असून वय त्यांच्या बाजूने नाही. ते ८३ वर्षांचे आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्याला जे कठोर परिश्रम, धावपळ आणि लोकांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे ते शक्य नाही. त्यांनी सल्लागार म्हणून राहावे आणि एका तरुणाला आघाडीवर आणावे.”
पुढे त्यांनी म्हटले की, “प्रियंका आणि इतर अनेक तरुण आहेत जे पक्षाला बळकटी देतील. राहुल हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची भूमिका पार पाडत आहेत. कोणीतरी अध्यक्ष बनेल आणि त्यांची भूमिका पार पाडेल. काँग्रेसच्या एका खऱ्या कार्यकर्त्या म्हणून सोनिया गांधींना हे माझे वैयक्तिक आवाहन आहे.”
मोकीम यांच्या पत्रात काय होते?
माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात मोकीम यांनी पक्षाची स्थिती चिंताजनक, हृदयद्रावक आणि असह्य असल्याचे वर्णन केले आहे. ओडिशातील सलग सहा पराभव आणि तीन मोठ्या राष्ट्रीय पराभवांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि काश्मीरमधील अलिकडच्या खराब कामगिरीचा उल्लेख संघटनात्मक दुरावा असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर, मोकीम यांनी नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमधील वाढत्या अंतराबद्दल बोलले आणि आमदार असूनही जवळजवळ तीन वर्षे राहुल गांधींना भेटू शकले नाही हे उघड केले. “ही वैयक्तिक तक्रार नाही तर भारतातील कार्यकर्त्यांमध्ये जाणवणाऱ्या व्यापक भावनिक विसंगतीचे प्रतिबिंब आहे,” असे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी पक्षाला भारतातील तरुणांशी जोडण्यात अपयश आल्याचेही निदर्शनास आणून दिले, जे ३५ वर्षांखालील लोकसंख्येच्या ६५% आहेत. मोकीम म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस भारतातील तरुणांशी जुळवून घेऊ शकत नाही. त्यांनी प्रियंका गांधी यांना केंद्रीय नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्याचे आवाहन केले आणि सचिन पायलट, डीके शिवकुमार, ए. रेवंत रेड्डी आणि शशी थरूर यांसारख्या इतर नेत्यांनी पक्षाचे मुख्य नेतृत्व करावे असे सांगितले. त्यांनी पक्षाची “ओपन-हार्ट सर्जरी, वैचारिक आणि संघटनात्मक नूतनीकरण” करण्याची मागणी केली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचा इथिओपिया दौरा; काय असणार चर्चेचा अजेंडा?
इस्रायली सैन्याकडून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या वरिष्ठ दहशतवाद्याचा खात्मा
पाकिस्तानी पिता- पुत्राने केला सिडनीमधील हल्ला! पोलिसांनी काय दिली माहिती?
वानखेडेवर मेस्सीच्या कार्यक्रमात धावून आला ‘गणपती बाप्पा’
स्वातंत्र्यलढ्यापासून काँग्रेसशी जवळचे संबंध असलेले मोकीम हे आजीवन कॉंग्रेस कार्यकर्ते आहेत. त्यांनी २०१९ मध्ये ३५ वर्षांनी बाराबती- कटकची जागा परत मिळवण्यासह त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रचार करूनही त्यांची मुलगी सोफिया फिरदौस २०२४ मध्ये याच मतदारसंघातून विजयी झाली.







